अभिनय कट्ट्यावर उलगडला ४५० व्या कट्ट्याचा प्रवास, विविध कलाविष्कार सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:11 PM2019-10-15T17:11:28+5:302019-10-15T17:13:07+5:30
अभिनय कट्टा कलागुणांना वाव देणारे खुले व्यासपीठ.ठाण्याच्या सांस्कृतिक इतिहासातील एक सोन्याचं पान.नवोदित आणि होतकरू कलाकारांसाठी हक्काचं रंगमंच.
ठाणे : अभिनय कट्ट्याचा अविरत सोनेरी प्रवास 450 कट्ट्याचा झाला. म्हणूनच 450 व्या कट्ट्यावर सर्व कलाकारांनी विविध कलाकृतींचे सादरीकरण करून 450 वा कट्ट्यासोबतच वाचक कट्टा क्रमांक 50 सुद्धा जल्लोषात साजरा झाला. अभिनय कट्टा 450 आणि वाचक कट्टा 50 च्या संयुक्त जल्लोषाला आम्ही सारे छंदानंदी ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या सादरीकरणाने एक आगळी वेगळी किनार दिली.
आपल्या सुरुवातीच्या संघर्षात एक कलाकार म्हणून स्वतःला घडवून घेताना एक माणूस म्हणून समृद्ध होण्याचं एक गुरुकुल म्हणणे अभिनय कट्टा. अभिनेता दिग्दर्शक किरण नाकती ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सतत नऊ वर्ष काळविश्वात स्वतःच अनमोल योगदान अभिनय कट्टा ह्या चळवळीने दिले. मायनगरीत चंदेरी दुनियेची स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देणार एक हक्काचं स्थान म्हणजे अभिनय कट्टा. आजवर अभिनय कट्ट्यावर हजारो कलाकृती हजारो पात्र विविध सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रम राबविलेत. त्यात एकपात्री, द्विपात्री, अभिवाचन, नृत्यभिनय स्पर्धांसोबतच सुनामी ग्रस्त मदत, रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, समाजोपदेशिक पथनाट्य, कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना मदत अशा अनेक सामाजिक उपक्रम राबविलेत. अभिनय कट्ट्यासोबतच वाचनप्रेमींसाठी वाचक कट्टा, संगीतप्रेमींसाठी संगीत कट्टा आणि गतिमंदमुलांच्या कलागुणांना व जीवनाला नवसंजीवनी ठरत असलेलं दिव्यांग कला केंद्र देखील चालू आहेत. अभिनय कट्ट्याची सुरुवात आम्ही सारे छंदानंदी ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुंदर कार्यक्रमाने सुरुवात झाली. सदर सादरीकरणात विविध लेख, कविता,गाणी आणि भजन सादर झाली. सदर कार्यक्रमात आशा रानडे, सुप्रिया पाठक, मानवतकर, कुमुद पाटील, माने, आशा घोलप, कौशल्य देऊसकर, कल्पना दारव्हेकर, वनिता चिंचोळकर, मनोहर पवार ह्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी विविध कलाविष्कार सादर केले. वाचक कट्टा 50 चे औचित्य साधून राजश्री गढीकर ह्यांनी अभिवाचन सादर केले. अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी नाट्यरंग ह्या सदरात 'जाऊ बाई जोरात' आणि 'शांतेच कार्ट चालू आहे' ह्या नाटकातील प्रवेश सादर केले. जाऊ बाई जोरात मध्ये न्युतन लंके, साक्षी महाडिक, रोहिणी थोरात, विद्या पवार, रुक्मिणी कदम, शुभांगी भालेकर आणि आरती ताथवडकर ह्यांनी अभिनय केला तर शांतेच कार्ट चालू आहे मध्ये ओमकार मराठे, आकाश माने आणि महेश झिरपे ह्यांनी अभिनय केला दोन्ही सादरीकरणाची दिग्दर्शन किरण नाकती ह्यांनी केले. आदित्य नाकती दिग्दर्शती आणि अविनाश ओव्हाळ लिखित अंडरलाईन ही द्विपात्री सहदेव साळकर आणि ओमकार मराठे ह्यांनी सादर केली. प्रतीक लोंढे ह्याने 'स्टँड अप' सादर केला तसेच शितूत ह्यांनी एकपात्री अभिनय सादर केला. परेश दळवी, अभय पवार आणि रोहित सुतार ह्यांनी परेश दळवी दिग्दर्शित अभिनय कट्टा... स्वप्नांचा यशोमार्ग ह्या मुकाभिनयाचे सादरीकरण केले. अभिनय कट्टा बालसंस्कारशास्त्र विभागातील श्रेयस साळुंखे, चिन्मय मोर्ये, पूर्वा तटकरे, वैष्णवी चेऊलकर ह्यांनी अभिनय कट्टा गीतावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी अभिनय कट्ट्याने पत्र रूपाने कलाकार आणि रसिक प्रेक्षकांशी संवाद साधला. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन अभिनय कट्ट्याचे कलाकार आदित्य नाकती आणि कदिर शेख ह्यांनी केले.
अभिनय कट्टा हीच आपल्या कलाकारांची माऊली आणि हाच आपला ईश्वर. कलाकाराला प्रगल्भ करण्यासाठी अभिनय कट्ट्याचे योगदान अनमोल आहे. अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा अभिनय कट्ट्यावरच गिरवला. विश्वविक्रमी 500 व्या कट्ट्याची ओढ आपल्या सर्वांना लागलेली आहे ह्या रंगमंचाच्या वंदन करूया आणि कलासृष्टीतील आपली वाटचाल अजून जोशात करूया असे आवाहन अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.