उल्हासनगरातील ९ धागा कारखाने बंद?, कोर्टाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:09 AM2017-12-06T01:09:51+5:302017-12-06T01:10:04+5:30
उल्हास नदीला प्रदूषित करणारे ९ धागे कारखाने प्रदूषण मंडळाने सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद केले आहेत. मंडळाने कारखान्यांना नोटिसा पाठवून ते बंद करण्याचा इशारा दिला आहे
उल्हासनगर : उल्हास नदीला प्रदूषित करणारे ९ धागे कारखाने प्रदूषण मंडळाने सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद केले आहेत. मंडळाने कारखान्यांना नोटिसा पाठवून ते बंद करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक अधिकारी विशाल मुंडे यांनी दिली.
बंद झालेल्या कारखान्यात एम.एस. थ्रेड वर्क, बेस्ट थ्रेड वर्क, बंटी भाटिया, जितू डाईंग, हिंदुस्थान डाईंग वर्क, विजय डाईंग, एस.टी. थ्रेड वर्क, जी. पी. थ्रेड वर्क, आर.के. थ्रेड वर्क यांचा समावेश आहे. वालधुनी व उल्हास नदीला प्रदूषित करणाºया जीन्स कारखान्याची वीज व पाणी जोडणी खंडित करा, असा आदेश सर्वाेच्च न्यायालयाने महापालिकेसह महावितरणला दिल्यावर बहुतांश जीन्स कारखाने बंद झाले.
मात्र खेमानी नाल्याच्या किनाºयावरील धागे कारखान्याचे रंगहीन सांडपाणी नाल्यावाटे उल्हास नदीत सोडले जाते. याचा व्हिडीओ आठवडयापूर्वी वालधुनी बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी सोशल मीडियावर टाकून कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार मंडळाच्या अधिकाºयांनी पाहणी केली. अधिकारी मुंडे यांनी नोटीसा पाठवल्या. विनापरवाना कारखाने सुरू असलेले धागे कारखान्यांचे सांडपाणी थेट खेमानी नाल्यात सोडत आहेत. ज्या ठिकाणी खेमानी नाला मिळतो त्याच ठिकाणाहून एमआयडीसी पाणी उचलून तब्बल २१ लाख नागरिकांना पाणीपुरवठा करते. याबाबतच्या जनहित याचिकेवर न्यायालयाने अशा कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले.
कारखान्यांची केवळ पाहणी
शहरातील खेमानी नाला परिसरात असलेले अनेक धागे कारखाने विनापरवाना सुरू आहेत. कारखान्यातील सांडपाणी थेट खेमानी नाल्यावाटे उल्हास नदीत मिळते. अशा कारखान्यांची मंगळवारी पाहणी करून त्यांना एका आठवडयात नोटीसा देणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार असे कारखाने बंद करावे लागणार असून एका महिन्यात कारवाई करणार असल्याची प्रतिक्रीया मुंडे यांनी दिली.