9 वर्षांपासून काम करणाऱ्या मोलकरणीने केली साडे नऊ लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 09:37 PM2020-01-06T21:37:00+5:302020-01-06T21:39:08+5:30
हैदराबाद येथे फिरण्यासाठी जात असताना सानिका यांना घरातील कपाटात त्यांचे सोन्याचे दागिने सापडले नाहीत .
मीरारोड - गेली दहा वर्ष घरकाम करणाऱ्या मोलकरणीनेच नियमितपणे मालकाच्या घरात चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून भाईंदरच्या नवघर पोलिसांनी मोलकर्णीस अटक केली आहे .
भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट येथील वर्धमान कॉम्प्लेक्स मध्ये चंदन राऊळ हे पत्नी सानिका , मुली स्वरा , नुरवी व पुरवी सह राहतात . त्यांनी 2011 साली घरकामासाठी नवघर मार्गावरील श्रीधाम अपार्टमेंट मध्ये राहणारी रुचिता रिषी मोरे ( 30 ) हिला घरकामासाठी ठेवले होते . रुचिता सायंकाळी कमला येत असे व सकाळी जात असे . 21 डिसेम्बर रोजी राऊळ कुटुंबीय हैदराबाद येथे फिरण्यासाठी जात असताना सानिका यांना घरातील कपाटात त्यांचे सोन्याचे दागिने सापडले नाहीत .
हैदराबाद येथे जायचे असल्याने सर्व कुटुंब घर बंद करून गेले . 2 जानेवारीला घरी परतल्यावर चंदन व सानिका यांनी मोलकरीण रुचीता मोरे हिला सुगावा न लागू देता 3 जानेवारी रोजी कपाटात गुप्त कॅमेरा बसवला . रात्री जेवण करून दोघे चित्रपट पाहण्यास गेले . कपाटातील कॅमेऱ्याची लिंक सानिका यांच्या मोबाईलशी जोडलेली असल्याने रात्री पाऊण च्या सुमारास रुचीता हि कपाट उघडून आतील वस्तू काढताना दिसून आली . घरातील दागिने आदी 9 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज रुचिता हिनेच चोरल्याची खात्री झाल्याने सानिका यांनी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी रुचिताला अटक केली आहे .