यंदा शाडूमातीच्या मूर्तींवर ९० टक्के भर; कोरोनामुळे भक्तांनीच कमी उंचीच्या मूर्तीला दिलं प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 02:06 AM2020-08-24T02:06:10+5:302020-08-24T02:06:28+5:30

कोरोनामुळे यंदा सर्वत्र साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. ठाणे महापालिकेने उत्सवासंदर्भात नियम व अटी लागू केल्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जन घाटावर न जाता अनेक कुटुंबांनी घरीच विसर्जन करण्याचे ठरविले.

90 per cent emphasis on shadu idols this year; Due to the corona, the devotees preferred the low height idol | यंदा शाडूमातीच्या मूर्तींवर ९० टक्के भर; कोरोनामुळे भक्तांनीच कमी उंचीच्या मूर्तीला दिलं प्राधान्य

यंदा शाडूमातीच्या मूर्तींवर ९० टक्के भर; कोरोनामुळे भक्तांनीच कमी उंचीच्या मूर्तीला दिलं प्राधान्य

Next

ठाणे : कोरोनामुळे गणेशभक्तांनी घरगुती विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी आपल्या घरी बसविल्या जाणाऱ्या मूर्तीची उंची कमी केली. घरगुती गणेशोत्सवाबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही प्लास्टर आॅफ पॅरिसपेक्षा शाडूच्या मातीच्या मूर्तींना पसंती दिल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. गेल्या वर्षी प्लास्टर आॅफ पॅरिसवर भर होता. यंदा मात्र कोरोनामुळे ९० टक्के शाडूच्या मातीच्या मूर्तींवर भर दिला असून फक्त १० टक्केच प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती गणेशभक्तांनी नेल्या असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

कोरोनामुळे यंदा सर्वत्र साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. ठाणे महापालिकेने उत्सवासंदर्भात नियम व अटी लागू केल्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जन घाटावर न जाता अनेक कुटुंबांनी घरीच विसर्जन करण्याचे ठरविले. त्यामुळे यावेळेस त्यांनी आपल्या घरातील मूर्तींच्या उंचीवर स्वत:हूनच निर्बंध आणले. तीन ते चार फूट उंचीची मूर्ती घरात बसविणाºया गणेशभक्तांनी उंची कमी करून एक ते दीड फुटांच्या मूर्तींवर भर दिला. तसेच, शाडूची माती पाण्यात पटकन विरघळते, त्यामुळे प्लास्टर आॅफ पॅरिसपेक्षा शाडूच्या मातीच्या मूर्तींना भक्तांची पसंती आहे. यापुढेही गणेशभक्तांनी शाडूच्या मातीच्या मूर्तींनाच पसंती द्यावी, अशी अपेक्षा मूर्तिकारांनीदेखील व्यक्त केली आहे. शासनाने मूर्तीची उंची मंडळांनी कमी करण्याचे आवाहन केल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही शाडूच्या मातीच्या मूर्तींवर भर देऊन दोन ते तीन फुटांपर्यंतच्या मूर्तींना पसंती दिली असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. भक्तांनी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन केल्याचे ठिकठिकाणी जाणवले.

यंदा मोठ्या मूर्ती घेण्याकडे भक्तांचा कल नसल्याचे दिसून आले. दोन फूट उंचीची मूर्ती खरेदी करणाºया कुटुंबांनी एक ते दीड फुटांच्या मूर्तीला पसंती दिली. - अरुण बोरिटकर, मूर्तिकार

पर्यावरणाच्या दृष्टीने गणेशभक्तांनी पुढच्या वर्षीपासून पुढेही शाडूच्या मातीच्या मूर्तींकडे वळावे, असा आमचाही आग्रह आहे. यंदा मातीच्या मूर्तींना पसंती आहे. तसेच, भक्तांनी स्वत:हूनच उंची कमी केली, हे चांगलेच झाले. आठ इंच ते दोन फुटांपर्यंतच्या मूर्तींना मागणी जास्त आहे. - सुरेंद्र पांचाळ, मूर्तिकार

गेल्या वर्षीपर्यंत गणेशभक्तांना मूर्तींमध्ये खूप डिझाइन हवे असायचे, त्यामुळे ते प्लास्टर आॅफ पॅरिसवर भर देत. यंदा मात्र कोरोनामुळे घरात विसर्जन करणार असल्याने ९० टक्के भक्त शाडूच्या मूर्ती घेऊन गेले आहेत. - प्रसाद वडके, मूर्तिकार

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा चार फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्ती बसविल्या आहेत. सर्व मंडळे हे शासनाच्या नियमांचे पालन करीत आहेत. कमीतकमी दोन ते जास्तीतजास्त तीन फूट गणेशमूर्तींची उंची ठेवली आहे. तसेच, पर्यावरणस्रेही मूर्ती बसविल्या आहेत.
- समीर सावंत, अध्यक्ष, ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समिती

Web Title: 90 per cent emphasis on shadu idols this year; Due to the corona, the devotees preferred the low height idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.