उल्हासनगरातील ९० डिग्री, १०० डेज व अॅपल बार सिल, महापालिकेची कारवाई
By सदानंद नाईक | Published: December 27, 2023 06:47 PM2023-12-27T18:47:42+5:302023-12-27T18:48:24+5:30
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पत्रानुसार महापालिका सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने तिन्ही बार बुधवारी दुपारी सील केले आहेत.
उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील रात्री उशिरा पर्यंत सुरू असलेल्या ९० डिग्री, १०० डेज व अॅपल बारवर मध्यवर्ती पोलिसांनी गेल्या आठवड्यात छापा टाकून ५० बारबालांसह ७८ ग्राहकांवर कारवाई केली. नवीन वर्षाच्या आगमनापूर्वी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या पत्रानुसार महापालिका अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी तिन्ही डान्सबार सील केले.
उल्हासनगरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बार, रेस्टॉरंट, फास्टफूड कॉर्नर, डान्सबारमुळे गुन्हेगारीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठवड्यात मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या पथकाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १०० डेज, ९० डिग्री व ॲपल डान्सबारवर छापा टाकून ५० बारबाला व ७८ ग्राहकावर कारवाई केली होती.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी पुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर क्रिकेट सट्टाप्रकरणी धुळे जिल्हा क्राईम विभागाने ६ बुक्कीना अटक केली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पत्रानुसार महापालिका सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने तिन्ही बार बुधवारी दुपारी सील केले आहे.
शहरात गेल्या आठवड्यात एका मद्यधुंद कार चालकांनी दोन रिक्षासह काही कारला धडक दिल्याने, तिघांचा मृत्यू तर ३ जण जखमी झाले. याप्रकरणी कारचालकाला अटक करून पोलीस चौकशी करीत आहेत. शहरात उशिरापर्यंत बार, डान्सबार, रेस्टॉरंट, फास्टफूड कॉर्नर सुरू राहत असल्याने अपघाताच्या व गुन्हेगारीच्या घटनेत वाढ झाल्याचा आरोप होत आहे. तसेच मध्यवर्ती पोलिसांनी शहरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या एकून तीन डान्सबारवर छापा टाकून कारवाई केली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस कारवाई करीत आहेत.