परराज्यातून येणारे ९० टक्के प्रवासी ‘आरटीपीसीआर’विना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:43 AM2021-05-20T04:43:59+5:302021-05-20T04:43:59+5:30
कल्याण : कोरोनाला आळा घालण्यासाठी परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी ४८ तास आधी आरटीपीसीआर चाचणी केल्याचा अहवाल दाखवून प्रवास करणे ...
कल्याण : कोरोनाला आळा घालण्यासाठी परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी ४८ तास आधी आरटीपीसीआर चाचणी केल्याचा अहवाल दाखवून प्रवास करणे बंधनकारक आहे. मात्र, परराज्यातून रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून कल्याण स्थानकात आलेल्या प्रवाशांची चौकशी केली असता त्यांच्याकडे हा अहवाल नसल्याचे आढळून आले. परिणामी या प्रवाशांमुळे कोरोना पसरण्याची शक्यता असल्याने त्यांची कल्याण स्थानकात अँटिजन चाचणी केली जात आहे.
मध्य रेल्वेवरील जंक्शन असलेल्या कल्याण स्थानकात दररोज पूर्व आणि दक्षिण भारतातून येणाऱ्या अनेक गाड्या थांबतात. त्यात उत्तर प्रदेश, बिहारमधून येणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी प्रवासापूर्वी ४८ तास आधी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. मात्र, परप्रांतातून येणारे प्रवासी ही चाचणी न करताच कल्याणमध्ये रेल्वेने दाखल होत आहेत. त्यामुळे कल्याण स्थानकात अशा प्रवाशांची रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडून कसून चौकशी केली जात आहे. जवळपास ९० टक्के प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणी अहवाल नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे या प्रवाशांची अँटिजन चाचणी केली जात आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली मनपाने अँटिजन चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र कोरोना रोखण्यासाठी रेल्वेकडून कोणत्याही ठोस प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याचे यातून उघड होत आहे.
संसर्गाची भीती?
- केडीएमसी हद्दीत १७ फेब्रुवारीपासून आलेली कोरोनाची दुसरी लाट सध्याच्या लॉकडाऊनमुळे ओसरताना दिसत आहे. सध्या मनपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत परराज्यातून आरटीपीसीआर चाचणी न करताच प्रवासी कल्याणमध्ये येत असतील तर कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- जून २०२० मध्ये मिशन बिगिन अगेन या मोहिमेंतर्गत लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले होते. कोरोनाला आळा घालण्यासाठी केडीएमसीने तेव्हापासून रेल्वे स्थानक आणि बस डेपोंमध्ये प्रवाशांची कोरोना चाचणी सुरू केली होती.
----------------------