'सैन्य दलातील ९ हजार कॅप्टन, मेजर पदं आजही रिक्त'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 04:32 PM2019-04-05T16:32:49+5:302019-04-05T16:38:22+5:30

सेवानिवृत्त मेजर अच्युत देव यांची खंत

9000 post of Captains and majors are vacant in security forces says retired major achyut dev | 'सैन्य दलातील ९ हजार कॅप्टन, मेजर पदं आजही रिक्त'

'सैन्य दलातील ९ हजार कॅप्टन, मेजर पदं आजही रिक्त'

Next

डोंबिवली- सैन्य दलात जाण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि देशप्रेम असण्याची गरज आहे. शारीरिक दृष्ट्या थोडी कमतरता असल्यास त्यांची तयारी करून घेता येऊ शकते. निस्वार्थी बुद्धीने देशासाठी काही करण्याची मानसिकता असल्यास चांगले काम घडेल. आपल्याकडे सैन्यदलात भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात. देशप्रेम आणि इच्छाशक्तीच्या अभावी ते अर्जदार सैन्यात भरती होऊ शकत नाहीत. आजही सैन्यदलातील ९ हजार जागा कॅप्टन आणि मेजर पद रिक्त आहेत, अशी खंत सेवानिवृत्त मेजर अच्युत देव यांनी व्यक्त केली.

गणेश मंदिर संस्थान, नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीतर्फे विद्यार्थी सैन्य दलात जाण्यासाठी प्रेरित व्हावी या उद्देशाने देव यांचा विद्यार्थ्यांशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन केले होेते. यावेळी देव बोलत होते. स्वामी विवेकानंद शाळेच्या राणाप्रताप आणि गुरूकुल द डे स्कूल येथील विद्यार्थ्यांशी देव यांनी संवाद साधला. स्वामी विवेकानंद शाळेत विद्यार्थ्याशी संवाद साधताना व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुभाष वाघमारे, कार्यवाह दिपक कुलकर्णी उपस्थित होते.

देव म्हणाले, १९६५ च्या लढाईची गोष्ट सांगताना त्यांनी अब्दुल हमीद यांची शौर्यगाथा सांगितली. सैनिकांची शौर्यगाथा महत्त्वाची आहे. जाज्वल्य देशभक्ती महत्त्वाची असते. ते शिक्षण भारतीय सैन्यात दिले जाते. ते देशासाठी लढत असतात. पाकिस्तानने आपल्यावर कितीही हल्ले केले, तरी त्याला चोख उत्तर द्यायला आपले सैन्य दल सक्षमपणे उभे आहे. त्यामुळे या हल्ल्यांना घाबरण्याची गरज नाही. सैन्य दलात ज्या मानसिकतेची मुले यायला हवी आहेत ती येत नाहीत. सैन्य दलात तुम्ही किती हुशार आहात याला महत्त्व नाही. राष्ट्रप्रेम, प्रबळ इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. ज्यांना पैसा कमवायचा आहे, त्यांच्यासाठी सैन्य दल नाही. कारण सैन्य दलात मोठ्या अधिकारी पदावरदेखील तेवढा पैसा मिळत नाही. सरकार तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व्यवस्थित होईल याची काळजी घेते. मला विद्यार्थ्यांना उदास करायचे नाही पण सत्य परिस्थिती सांगत आहे. एखाद्याने सैन्य दलाला करियर म्हणून निवडल्यावर त्या ठिकाणाहून मागे वळता येणार नाही. वाघासारखे असला तरच सैन्यदलात जा. सैन्य दलात हुशारी, समन्वय, आणि मानसिकतेची गरज असते. सैन्य दलात येण्यासाठी कोणत्याही कोचिंगची गरज नाही. देशासाठी काही करण्याची मोठी इच्छाशक्तीची गरज असते. एनडीए ही संरक्षण दलाला पूरक अशी संस्था आहे. या संस्थेत सैन्य दलासह इतर ही शिक्षण पूर्ण करता येते. काही पालक मुलांना सैन्य दलात जाण्यापासून रोखतात त्यांना समपुदेशनची गरज आहे. कारगील युध्दात ५२५ सैनिक मारले गेले. त्यापेक्षा अधिक लोक ठाणे आणि डोंबिवलीमध्ये रस्ता अपघातात मारले जातात. जीवाला धोका सर्व ठिकाणी आहे. सैनिकाला आपला शत्रू कोण हे तरी माहीत असते. रस्ता अपघातात आपल्याला कोण मारणार आहे हेदेखील माहीत नसते. दुष्ट शक्तीना मारण्यासाठी योद्ध्याची गरज असते आणि त्यासाठीच सैन्य दलात गेले पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले.

गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहूल दामले, उपाध्यक्षा अलका मुतालिक, विश्वस्त मंदार हळबे, अच्युत कºहाडकर, गौरी खुंटे,संयोजन समितीचे सहसंयोजक भूषण धर्माधिकारी, चिन्मय कुलकर्णी, अनिकेत घमंडी आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी आणि शिक्षक ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सुनिल पांचाळ यांनी केले.

 

 

Web Title: 9000 post of Captains and majors are vacant in security forces says retired major achyut dev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.