१५ दिवसांत ९ हजार चाचण्या, ७६८ पॉझिटिव्ह आढळले; मीरा-भाईंदर महापालिकेने वाढवली व्याप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 11:06 AM2020-09-01T11:06:43+5:302020-09-01T11:07:01+5:30
मीरा भाईंदर मध्ये सोमवार पर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १२ हजार ६०६पर्यंत पोहचली आहे . तर १० हजार ७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत .
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने आता कोरोना रुग्णांना शोधून काढण्यासाठी अँटीजन चाचणी मोहीम व्यापक स्वरूपात चालवली आहे . शहरात सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांसह गृह संकुल , झोपडपट्ट्यां मध्ये मोहीम राबवली जात असून गेल्या १५ दिवसात ९ हजार लोकांची चाचणी केली असता त्यात ७६८ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
मीरा भाईंदर मध्ये सोमवार पर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १२ हजार ६०६पर्यंत पोहचली आहे . तर १० हजार ७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत . शहरात कोरोना मुळे ४२१ लोकांचा मृत्यू झाला आहे . कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिकेने कोरोना रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार व्हावेत म्हणून या आधी घरो घरी जाऊन सर्वेक्षण केले होते . परंतु त्या सर्वेक्षणात प्रत्येकाची ऑक्सिजन लेव्हल व तापमान चाचणी झाली नसल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नव्हता.
कोरोना चाचणी तातडीने व्हावी म्हणून अँटीजन किट पालिकेने मागवल्या तर काही शासन कडून मिळाल्या. आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी सुरवातीला पालिका आरोग्य केंद्रातूनच अँटीजन तपासणी चालवली . नंतर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पेणकरपाडा , विनायक नगर , शांती पार्क , भाईंदर सेकंडरी शाळा परिसर , उत्तन धवगी डोंगरी भागात अँटीजेन टेस्ट साठी शिबिरे सुरु करण्यात आली. आता पालिकेने शहरातील प्रमुख नाके , सार्वजनिक ठिकाणे , गृह संकुले आदी परिसरात देखील कोरोनाचे रुग्ण शोधून काढण्यासाठी मोफत अँटीजन चाचणी करिता शिबीर सुरु केली आहेत . रविवारी ३२ व आज सोमवारी देखील ३२ शिबीरे शहरात घेण्यात आली आहे .
वैद्यकीय कर्मचारी , प्रभाग अधिकारी व कर्मचारी , पोलीस आदींनी सार्वजनिक ठिकाणी शिबीर लावून तेथे ये जा करणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या सुरु केल्या आहेत . काही ठिकाणी नगरसेवक देखील उपस्थित राहून फोटो सेशन करून घेत आहेत. या शिबिरां मुळे कोरोना चाचणी वा संशया पासून लोकांना सुद्धा गाठले जात असून त्यांची तपासणी केली जात असल्याने जागेवरच अहवाल कळत असल्याने ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले ते खुश होत आहेत . तर ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यांना पुढील उपचार व तपासणी साठी पालिका रुग्णालय वा कोविड केअर मध्ये नेले जात आहे .
या बाबत बोलताना पालिकेचे डॉ . संतोष पांडे यांनी सांगितले कि , पालिकेने आता नागरिकां पर्यंत पोहचून अँटीजन चाचणी सुरु केली असून या मोफत चाचणीचा नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे . या शिबिरां मुळे चाचणीची संख्या वाढून कोरोना पॉझिटिव्ह लोकांचा शोध घेऊन उपचार करणे सुलभ झाले आहे . ज्यांना स्वतःला कोरोना असल्याची माहिती नव्हती त्यांची चाचणी होऊन कोरोनाचा फैलाव कमी होण्यास मदत मिळणार आहे .