कॅशलेस व्यवहाराला ९० हजार करदात्यांची पसंती; ठामपाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 12:59 AM2020-12-01T00:59:13+5:302020-12-01T00:59:22+5:30
ऑनलाइन करभरणामुळे ९७.६२ कोटी जमा
ठाणे : कोरोनामुळे ठाणे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटल्याने मालमत्ताकर माफ करावा, अशी मागणी होत होती. असे असतानाही महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ताकरापोटी ३२२.२५ कोटी जमा झाले असून ठाणेकरांनी कॅशलेस व्यवहाराला पसंती देत आपल्या कराचा भरणा ऑनलाइन केला आहे. यानुसार तब्बल ९० हजार करदात्यांनी आपला करभरणा हा कॅशलेस केला आहे. यातून पालिकेच्या तिजोरीत ९७.६२ कोटींचा भरणा झाला आहे. तर करसंकलन केंद्रातदेखील एटीएम, डेबिट, क्रेडिटकार्डची सुविधा उपलब्ध करून दिल्याने करभरणा केंद्रावर होणारी गर्दीदेखील कमी झाली आहे.
ठाणे महापालिकेने शहरातील संपूर्ण पाच लाख दोन हजार करदात्यांना देयके अदा केली होती. त्यातील २.२६ लाख करदात्यांनी आपला कर भरला आहे. तर मागील वर्षी याच कालावधीत ३५० कोटींची वसुली झाली होती. यंदा ती ३२२ कोटींहून अधिक झाली आहे. त्यातही ९० हजार करदात्यांनी ऑनलाइन करभरणा करून ठाणे महापालिकेला सहकार्य केले आहे.
केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहार करण्यासाठी नागरिकांना प्राेत्साहन दिले आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने करदात्यांना आपल्या कराची रक्कम भरता यावी, या उद्देशाने कॅशलेस व्यवहाराला पसंती दिल्याचे दिसून आले आहे. त्यातही कोरोनामुळे नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता यावे, त्यांनी घरबसल्या आपले व्यवहार करावेत म्हणून यंदा करभरणा पद्धतीत सुलभता आणली आहे.
यानुसार ९० हजार करदात्यांनी ऑनलाइन ९७.६२ कोटी रुपयांचा करभरणा केला आहे. तसेच २१ संकलनकेंद्रांवर एटीएम, डेबिट, क्रेडिटकार्डद्वारेदेखील मालमत्ताकर जमा करण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्याने याद्वारे ८४ लाखांचा करभरणा झाला आहे. तर मागील वर्षी ऑनलाइनद्वारे केवळ १६ टक्केच नागरिकांनी फायदा घेतला होता. मात्र, यंदा हे प्रमाण ३१ टक्क्यांवर गेले आहे, असे ठामपा सूत्रांनी सांगितले.