अंबरनाथच्या कोविड रुग्णालयातील ९१ रुग्ण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:36 AM2021-04-14T04:36:57+5:302021-04-14T04:36:57+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने डेंटल कॉलेजमधील कोविड रुग्णालयातील ६०० पैकी ४०० बेड ऑक्सिजन बेडचे केले आहेत. मात्र रुग्णांची ...
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने डेंटल कॉलेजमधील कोविड रुग्णालयातील ६०० पैकी ४०० बेड ऑक्सिजन बेडचे केले आहेत. मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे ४०० बेडही अपुरे पडत आहेत. ऑक्सिजन बेड फुल्ल झाले असून, नव्या रुग्णांना या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात येत आहे. तर दुसरीकडे ४०० रुग्णांपैकी ९१ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यांना वाचवण्यासाठी पालिकेच्या डॉक्टरांच्या पथकाचे प्रयत्न सुरू आहेत.
अंबरनाथ नगरपालिकेच्या डेंटल कॉलेजमधील ३० बेड आयसीयूचे आहेत. एवढी मोठी यंत्रणा उभारलेली असतानाही अंबरनाथ शहरासाठी ती कमी पडत असल्याचे दिसत आहे. गेल्या आठवडाभरात रुग्णांची संख्या वाढलेली असली तरी त्यात ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या सेंटरमधील सर्वच बेड फुल्ल झाले असून, आता नव्या रुग्णांना प्रवेश देण्याचे थांबवले आहे. त्यातच रुग्णांना आवश्यक असलेले रेमडेसिविर हे इंजेक्शनही उपलब्ध होत नसल्याने याठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत आहेत. डेंटल महाविद्यालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी पालिकेला मोठी कसरत करावी लागत आहे. आज दिवसभरात ३०हून अधिक रुग्णांना ऑक्सिजन बेडची गरज असतानाही त्यांना ते उपलब्ध करून देता आले नाही तर दुसरीकडे डेंटल महाविद्यालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात डॉक्टरांना मोठी कसरत करावी लागत आहे.
ज्या प्रमाणात रुग्ण बरे होत आहेत, त्याचप्रमाणात रुग्णांची प्रकृतीही खालावत असल्याने पालिकेसमोर ती चिंतेची बाब ठरत आहे. अनेक रुग्णांना उच्चदाबाने ऑक्सिजन पुरवठा करावा लागत असल्याने ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या एजन्सीलाही मोठी कसरत करावी लागत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा अखंडित सुरू ठेवण्यासाठी पालिकेचे पथक सातत्याने प्रयत्न करीत आहेत.