पालघरमध्ये कोरोना काळातही ९३ टक्के पोलिओ लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:10 AM2020-09-23T00:10:02+5:302020-09-23T00:10:08+5:30
गृहभेटीत उर्वरित लक्ष्य : प्रशासनाकडून नियोजनबद्ध कार्यक्र म
लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर आणि वसई या तीन तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यापैकी डहाणू तालुक्यात ४० हजार ३९ अपेक्षित लाभार्थ्यांपैकी ३७ हजार ३११ लाभार्थ्यांना डोस पाजण्यात आला. उर्वरित २ हजार ७२८ लाभार्थ्यांना गृहभेटीतून लसीकरण केले जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी संदीप गाडेकर यांनी दिली.
बालकांना प्राथमिक लसीकरण, नियमित सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत ० ते ५ वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे ही पोलिओ निर्मूलनाच्या यशासाठी असलेली त्रिसूत्री राबविली जात आहे. त्यानुसार रविवारी, २० सप्टेंबर रोजीच्या लसीकरण मोहिमेला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी केले होते.
पोलिओबाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, नगराध्यक्ष, नगरसेवक, पोलीस पाटील, जि.प. सदस्य ग्रापंचायत सदस्य यांनी मोहिमेचे उद्घाटन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते.
कोरोना काळात लहान बालकांना लसीकरण करते वेळी नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. रविवारी प्रत्येक बूथवर सॅनिटायझर, हात धुण्याची व्यवस्था लसीकरण करणाºया कर्मचारी स्वयंसेवक यांनी मास्क आणि ग्लोव्हज घातले होते.
प्रत्येक लाभार्थ्याला लसीकरण केल्यानंतर हात सॅनिटाईज करणे, येणाºया लाभार्थ्यांमध्ये योग्य ते अंतर ठेवण्यात येणे, सामाजिक अंतर पाळले तर बालकांना स्पर्श न करता केवळ पालकांच्या स्पर्शानेच बालकांना लस पाजणे आदी नियमांचे आरोग्य आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कसोशीने पालन केले.
दरम्यान, २ हजार ७२८ बालके लसीकरणापासून वंचित राहिली आहेत. त्यांना गृहभेटीद्वारे कर्मचारी डोस पाजणार आहेत.
या वेळेस सॅनिटायझर मास्क व ग्लोज घालून तसेच अन्य नियम पाळण्यात येऊन लसीकरण केले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.