मेट्रोवर ९४९ कोटींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 12:56 AM2019-01-26T00:56:02+5:302019-01-26T00:56:08+5:30
वडाळा ते कासारवडली मेट्रोच्या माती परिक्षणाच्या कामाला ठाण्यात सुरुवात झाली असून, ही मेट्रो गायमुखपर्यंत धावणार आहे.
- अजित मांडके
ठाणे : वडाळा ते कासारवडली मेट्रोच्या माती परिक्षणाच्या कामाला ठाण्यात सुरुवात झाली असून, ही मेट्रो गायमुखपर्यंत धावणार आहे. राज्य शासनाने चार अ मार्गाला याला मंजुरी देताना, मार्च २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी ९४९ कोटी खर्चास शुक्रवारी मान्यता देण्यात आली.
अनेक वर्षांपासून कागदावर राहिलेल्या आणि खर्चाच्या मुद्यावरून गंटाळल्या खात असलेल्या ठाणे मेट्रोला मुख्यमंत्र्यानी मागील वर्षी हिरवा कंदील दिल्यानंतर ठाण्यात माती परीक्षणाच्या कामाला वेग आला आहे. परंतु, ठाणे - घोडबंदर रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. येथील रहिवासी बस, रिक्षा किंवा इतर खाजगी वाहनांवर अवलंबून असून ते वाहतूककोंडीचा सामना करीत आहेत. त्यामुळे मेट्रो चार हा मार्ग गायमुखपर्यंत करावा अशी मागणी होती. त्यानुसार मेट्रो चारचा विस्तार गायमुखपर्यंत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाकरीता ९४९ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यताही दिली आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय कराच्या (९२.८६ कोटी) ५० टक्के ४६.४३ कोटी व राज्य शासनाच्या कराच्या १०० टक्के ७६.३४ कोटी व जमिनीची किंमत ३५ कोटी असे एकूण १५७.७७ कोटी राज्य शासनाकडून बिनव्याजी दुय्यम कर्ज देण्यासही मान्यता दिली. प्रकल्पाच्या अंमलबजावणीस प्राधिकरणाचा स्वत:चा निधी व न्यू डेव्हल्पमेंट बँक- जपान इंटरनॅशनल कोआॅपरेशन एजेन्सी आदी आंतरराष्टÑीय वित्तीय संस्थेमार्फत २७३.७२ कोटींचे अर्थ साहाय्य घेण्यास मान्यता दिली आहे.
>कारशेडसाठी ठामपाचे नियोजन
२०२२ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असल्याने, कर्ज प्रस्ताव अंतिम होईपर्यंत प्रकल्पाच्या स्थापत्य बांधकामासाठी प्राधिकरणाचा निधी वापरायचा आहे. त्यासाठी ४४९.०८ कोटींच्या खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाकरीता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. मेट्रो चारचा मार्ग आणखी सुसाट झाला असून तो गायमुखपर्यंत जाणार आहे. यासाठी आधीपासूनच हालचाली केल्याने मेट्रोचे कारशेड गायमुख येथे हलविण्यासाठी पालिकेने जागेचे नियोजन केले आहे.