Mira Bhayander | मीरा भाईंदरमध्ये ९५० कोटींच्या कचरा संकलन, वाहतूक ठेक्याचा वाद उच्च न्यायालयात
By धीरज परब | Published: December 22, 2022 09:46 PM2022-12-22T21:46:27+5:302022-12-22T21:46:27+5:30
साफसफाई कचरा संकलनसाठी पालिकेने काढल्या होत्या ९ वेळा निविदा
भाईंदर: मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या दैनंदिन साफसफाई व कचरा संकलन वाहतूक करणे कामी ५ वर्षांच्या तब्बल ९५० कोटी रुपयांच्या ठेक्या विरोधात आमदार गीता जैन सह अनेकांच्या तक्रारी होत आहेत. तर एका ठेकेदारानेच महापालिकेच्या निविदा प्रक्रिये विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने कार्यादेश देण्यास स्थगिती देण्याची याचिकाकर्त्याची मागणी मान्य केली नसली, तरी पालिकेस म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. २०१२ साली महापालिकेनी मे. ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट ह्या ठेकेदाराला पाच वर्षासाठी साफसफाई व कचरा वाहतूकचा ठेका दिला होता. २०१७ साली ठेका संपल्यानंतर देखील आजपर्यंत तत्कालीन नगरसेवक व प्रशासनाने ठेकेदारास अनेकवेळा मुदतवाढ दिली.
साफसफाई व कचरा संकलनसाठी पालिकेने ९ वेळा निविदा काढली होती. यावेळी पालिकेने प्रभाग समिती १ ते ३ करिता झोन १ तर प्रभाग समिती ४ ते ५ करिता झोन २ अशी विभागणी केली. पालिकेने मागवलेल्या निविदानुसार प्रत्येक झोनसाठी ४ निविदा आल्या होत्या. त्यातील झोन १ साठी पालिकेने ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट तर झोन २ साठी कोणार्क इन्फ्रा ह्या ठेकेदारांची निवड केली. झोन एक मध्ये ९०० सफाईक कामगार व तर न दोन मध्ये १३०० सफाईक कामगार असतील . पालिकेनी निविदेत प्रति सफाई कामगार यांचा दर १२४९ दिलेला होता . परंतु ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटने १४९४ रुपये तर कोणार्क इन्फ्रा यांनी १५०२ रुपये प्रति कामगार प्रति दिवस असा दर भरला होता. पालिकेच्या वाटाघाटी दरानंतर दोन्ही ठेकेदारांनी प्रति कामगार १३९९ रुपये असा दर निश्चित केला आहे.
पालिकेची २४ कचरा वाहक वाहने असून आणखी नवीन येणारी वाहने सुद्धा ठेकेदारांना दिली जाणार आहेत. त्यात तीन कामगार व एक चालक सह वाहनाची देखभाल दुरुस्ती, इंधन आदी सर्व खर्च ठेकेदाची जबाबदारी असणार आहे . ठेकेदारा कडून वाहने घेतल्यास ७ टनाच्या कॉम्पॅक्टर साठी १४ हजार ४०० रुपये आणि ५ टनाच्या साठी १३ हजार २०० तर ३.३ टनाच्या ७२०० रुपये प्रति दिवस असा दर असणार आहे. ५ वर्षांसाठीचा हा ठेका असून पहिल्या वर्षात झोन एक साठी ६३ कोटी आणि झोन दोन साठी ९३ कोटी रुपये ठेकेदारास अदा केले जातील . त्यात दरवर्षी त्यात १० टक्के रक्कम वाढवून ठेकेदारास दिली जाणार असून ५ वर्षाची एकूण रक्कम ९५० कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे.
दरम्यान, पालिकेच्या निविदा प्रक्रिया व ठेका मंजुरी विरोधात आर अँड बी इन्फ्रा ह्या स्पर्धेतील ठेकेदाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे . ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट ला काम देऊ नये असा मुंबई पालिकेचा निर्णय असताना मीरा भाईंदर महापालिकेने त्यास पात्र ठरवलेच शिवाय ग्लोबल ने झोन दोन मधून तांत्रिक लिफाफा उघडल्या माघार घेण्याचे पत्र दिले . पालिकेने ते मान्य करून त्याचा फायदा कोणार्क इन्फ्रा ह्या ठेकेदारास करून देण्यात आला . तर मे. कोणार्क इन्फ्रा हा ठेकेदार निविदेच्या अटीशर्तीत बसत नसतानाही त्याने दुसऱ्या कंपनीची अनुभवाची कागदपत्रे जोडल्याचा दावा केला आहे.