व्हॅलेंटाइन वीकमध्ये तब्बल ९६ जोडपी अडकली विवाहबंधनात, व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त हुकला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 12:07 AM2021-02-16T00:07:49+5:302021-02-16T00:08:19+5:30
Valentine's Week : व्हॅलेंटाइन डे, अनोखी तारीख, नववर्ष, गुढीपाडवा, अक्षय तृतीया अशा अनोख्या मुहूर्तावर लग्न करण्यासाठी विवाहेच्छुक जोडपी उत्सुक असतात; परंतु जगभरात कोरोनाचा हाहाकार पसरला आणि मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले.
ठाणे : विवाहाची तारीख संस्मरणीय ठरावी यासाठी विवाहेच्छुक जोडपी अनोख्या तारखेचा विवाह मुहूर्त साधतात. यादिवशी विवाह करण्याची जोडप्यांमध्ये अनोखी क्रेझ असते. फेब्रुवारी महिन्यात असलेल्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये ठाणे जिल्ह्यातील ९६ जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत. मात्र, रविवारी व्हॅलेंटाईन डे आल्याने त्यांचा या दिवशी विवाह करण्याचा मुहूर्त हुकला. या जोडप्यांनी एक दिवसानंतर म्हणजेच माघी गणेशोत्सवाचा मुहूर्त साधला. या दिवशी सर्वाधिक म्हणजेच तब्बल ६२ जोडप्यांनी विवाहासाठी नोंदणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
व्हॅलेंटाइन डे, अनोखी तारीख, नववर्ष, गुढीपाडवा, अक्षय तृतीया अशा अनोख्या मुहूर्तावर लग्न करण्यासाठी विवाहेच्छुक जोडपी उत्सुक असतात; परंतु जगभरात कोरोनाचा हाहाकार पसरला आणि मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले. मार्च ते मे महिन्यात विवाहाचे मुहूर्त अधिक असतात. या लॉकडाऊनमुळे अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले. गर्दीवर सरकारने बंदी घातली.
कोरोनाचा संसर्ग हळुहळु आटोक्यात येत असल्याने सरकारने केलेल्या अनलॉकनंतर विवाह सोहळे कमी लोकांच्या उपस्थितीत करण्याची अट घातली. त्यामुळे लॉकडाऊन काळात नोंदणी पद्धतीने विवाह करण्याची संख्या वाढली. जिल्हा विवाहनोंदणी कार्यालयाने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर विवाह नोंदणी कार्यालय सुरू ठेवले होते; परंतु कोरोनाच्या भीतीपोटी एकही नोंदणी झाली नव्हती.
मे ते ऑगस्ट २०२० यादरम्यान ठाणे जिल्ह्यातील ३५० हून अधिक जोडप्यांचा नोंदणी पद्धतीने विवाह झाला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ३० जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली. व्हॅलेंटाईन डेलादेखील विवाह करण्याची जोडप्यांमध्ये क्रेझ आहे. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. ७ फेब्रुवारी आणि त्यानंतर १४ फेब्रुवारीलाही रविवार आल्याने, तसेच १३ तारखेला शनिवारी कार्यालयाला सुट्टी असल्याने ८ ते १२ फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन वीकमध्ये ९६ विवाह नोंदणी पद्धतीने झाले.
तारिखनिहाय आकडेवारी पाहता ८ फेब्रुवारी रोजी २२, ९ फेब्रुवारी रोजी १५, १० फेब्रुवारी रोजी ९, ११ फेब्रुवारी रोजी ११, १२ फेब्रुवारी रोजी ३९ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केले. त्यानंतर सोमवारी माघी गणेशोत्सवाच्या दिवशी ६२ जोडप्यांनी विवाहासाठी जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी केल्याची माहिती या कार्यालयातील सूत्रांनी दिली.
रविवारी व्हॅलेंटाईन डे आल्याने या दिवशी विवाह नोंदणी कार्यालयात येऊन जोडप्यांना विवाह करता आला नाही. त्यामुळे सोमवारी त्यांनी नोंदणी केली होती. कोरोनामुळे १५ ते २० जोडपी सध्या विवाहासाठी येत आहेत. सोमवारी मात्र संख्या जास्त होती.
- अनिल यादव, विवाह नोंदणी अधिकारी, जिल्हा विवाह नोंदणी कार्यालय