हज यात्रेच्या सेवेकऱ्यांना घातला करोडोचा गंडा, ९६८ तरुणांची केली फसवणूक
By कुमार बडदे | Published: June 23, 2024 08:02 PM2024-06-23T20:02:50+5:302024-06-23T20:06:31+5:30
सौदी अरेबियातील मक्का येथे हजयात्रेला जगभरातून प्रत्येकवर्षी मुस्लीम बांधव जात असतात.तेथे नागरी सेवा देण्यासाठी सौदी सरकारला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत असते.
मुंब्राः हज यात्रा करण्यासाठी मक्का येथे जाणाऱ्या भाविकांना सेवा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेवेकऱ्यांची गरज भासते. या सेवेकऱ्यांना चांगले मानधन मिळत असल्याने ठराविक कालावधीसाठी बेरोजगार तरूण मक्केत जात असतात. अशा सेवेकऱ्यांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घालून पसार झालेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते अशरफ उर्फ शानू पठाण यांनी निवेदनाच्या माध्यमातून रविवारी मुंब्रा पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षकां कडे केली आहे.
सौदी अरेबियातील मक्का येथे हजयात्रेला जगभरातून प्रत्येकवर्षी मुस्लीम बांधव जात असतात.तेथे नागरी सेवा देण्यासाठी सौदी सरकारला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत असते. काही एजन्सी त्यांना मनुष्यबळ पुरवत असतात. बंगळुरू येथील एक एजन्सी ही सेवेक-यांना सौदी अरबमध्ये पाठवत असते. त्यासाठी मोबदला म्हणून एजन्सी प्रत्येक तरूणाकडून ६५ हजार रूपये घेते. या एजन्सीचा मुंब्रा येथील दलाल मोहम्मद आदिल आणि त्याचे साथीदार रफत सैय्यद, रोनक परवीन, शेहबाज शाहनवाज सैय्यद, मोहम्मद रफिक, मोहम्मद हनीफ गौडा यांनी व्हिसा, सौदी येथील निवासखर्च यासाठी मुंब्रा येथील सुमारे ३०० तरुणांकडून प्रत्येकी ३५ हजार ते ६५ हजार या प्रमाणे १ कोटी ९५ लाख रूपये उकळले आहेत. तर सबंध महाराष्ट्रातून ९६८ तरुणांकडून ६ कोटी २९ लाख २० हजार रूपये उकळून पोबारा केला असल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. ही एजन्सी बंगळुरू येथे असून या एजन्सीने देशभर असा घोटाळा केला असल्याचा संशय व्यक्त करुन,फसवणूक झालेल्यांनी पोलिसांशी किंवा व्यक्तीगत संपर्क साधावा,असे आवाहन त्यांनी केले.