ग्लोबल कोविड सेंटरमधील ९९ टक्के खाटा रिकाम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:46 AM2021-08-20T04:46:27+5:302021-08-20T04:46:27+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याने ठेकेदाराने काम करण्यास नकार दिला आहे. महासभेनेदेखील ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याने ठेकेदाराने काम करण्यास नकार दिला आहे. महासभेनेदेखील येथील अतिरिक्त कर्मचाऱ्यांना तूर्तास ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु येथील कर्मचाऱ्यांची समस्या अद्यापही सुटलेली नाही. अशातच सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने या रुग्णालयातील तब्बल ९९ टक्के खाटा रिकाम्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा विनाकारण खर्च का करायचा, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. सध्या या रुग्णालयात अवघे ४० रुग्ण दाखल आहेत.
ग्लोबल कोविड सेंटरमध्ये १ हजारहून अधिक खाटा रिकाम्या असून, केवळ ४० रुग्ण दाखल आहेत. त्यातील १६ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल असून, त्यापैकी ६ जण व्हेंटिलेटरवर तर दोघे ऑक्सिजनवर आहेत. इतर २२ जणांना लवकरच सुटी दिली जाणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याने येथील १ हजार बेड रिकामे आहेत. येथे उभारण्यात आलेला विलगीकरण कक्षही ओस पडला असून, ८९५ खाटा रिकाम्या असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून येथील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्यावरून डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. मुळात या कर्मचाऱ्यांना सुरुवातीला एक महिन्यासाठीच घेण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने त्यांना वारंवार मुदतवाढ देण्यात आली. परंतु आता कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने येथील कर्मचारीदेखील कमी केले जात आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी कोट्यवधींचा खर्च होत आहे. सध्या लाट ओसरल्याने हे कर्मचारी कमी केल्यास पालिकेच्या तिजोरीवरील भारही हलका होणार आहे. तिसरी लाट आलीच तर त्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासनही पालिकेने दिले आहे. असे असतानाही यावरून राजकारण तापल्याचे दिसत आहे.