‘त्या’ ४९९ कर्मचाऱ्यांना एका रात्रीत केडीएमसीची वर्कआॅर्डर!
By admin | Published: September 7, 2015 03:52 AM2015-09-07T03:52:31+5:302015-09-07T03:52:31+5:30
मुख्यमंत्री सोमवारी त्या २७ गावांचा निर्णय घेणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये रविवारी प्रसिद्ध झाले. याची कुणकुण केडीएमसीतील सत्ताधारी
डोंबिवली : मुख्यमंत्री सोमवारी त्या २७ गावांचा निर्णय घेणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये रविवारी प्रसिद्ध झाले. याची कुणकुण केडीएमसीतील सत्ताधारी शिवसेनेला लागली आणि महापौर कल्याणी पाटील यांनी त्या गावांमधील ४९९ कर्मचाऱ्यांना शनिवारी रात्रीच आयुक्त ई. रवींद्रन यांची मंजुरी मिळवून महापालिकेत रुजू करून घेतल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे त्यांची पत्रे शनिवारी रात्री पावणेनऊ ते रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संबंधितांना महापौर दालनात देण्यात आली. शिवसेनेचे बहुतांशी सर्व नेते तेथे उपस्थित होते, मात्र युतीतील घटक असणारा भाजपाचा एकही
प्रतिनिधी तेथे नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या पत्रांचे वाटप करताना सभागृह नेते कैलास शिंदे, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, शिवसेना गटनेते रवी पाटील आदींसह काँग्रेसचे गटनेते सदाशिव शेलार, मनसेचे गटनेते सुदेश चुडनाईक आदीही होते.
काही काळानंतर महापौर पाटील आणि शिंदे यांनी सकाळपर्यंत वाटप केल्याचेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)