कोरोनाकाळात ठाण्यातील ९९ कुपोषित बालके दगावली!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 05:36 AM2021-06-29T05:36:15+5:302021-06-29T05:36:29+5:30
जिल्ह्यातील गावपाड्यांत आजही १४७ बालके तीव्र (सॅम) कुपोषित आहेत. तर मध्यम (मॅम) कुपोषित १ हजार ५४३ बालके आहेत. कोरोनाची तिसरी लाट बालकांच्या दृष्टीने चिंता करणारी असल्याचे ऐकायला मिळत आहे
सुरेश लोखंडे
ठाणे : सध्याचा कोरोना महामारीचा काळ सर्वांसाठीच जीवघेणा ठरला आहे. यातही तग धरून, जीव मुठीत घेऊन जिल्ह्यात आदिवासी, दुर्गम, अतिदुर्गम आणि ग्रामीण भागांत १ हजार ६९० कुपोषित बालके जिल्ह्यात जगत आहेत. यातील तब्बल ९९ बालकांचा या महामारीच्या काळातील दीड वर्षात मृत्यू झाल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.
जिल्ह्यातील गावपाड्यांत आजही १४७ बालके तीव्र (सॅम) कुपोषित आहेत. तर मध्यम (मॅम) कुपोषित १ हजार ५४३ बालके आहेत. कोरोनाची तिसरी लाट बालकांच्या दृष्टीने चिंता करणारी असल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यात सध्या म्युकरमायकोसिस आणि आता डेल्टा प्लस या कोरोनाच्या विषाणूने डोकेवर काढले आहे. यावर मात करीत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार चिंता करायला भाग पाडणारी आहे. तिचा कहर लहानग्यांच्या जिवावर उठणारा असल्यामुळें त्यावर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
गावपाड्यांतील बालकांचे विविध स्वरूपाचे रखडलेले लसीकरण करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी आरोग्य यंत्रणेस तैनात केले आहे. गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत ९९ बालकांचा मृत्यू झाल्याचे आढळून आहे. यामध्ये मार्चपर्यंत ० ते १ वर्षापर्यंतच्या ६९ बालकांच्या मृत्यू झाला आहे. तर एक ते सहा वयोगटातील १८ बालके दगावली आहेत. याशिवाय मे अखेरपर्यंत १२ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात एक वर्षापर्यंतची नऊ आणि सहा वर्षांची तीन बालके दगावली आहेत. तीन वर्षांच्या तुलनेत दगावलेली ९९ बालके आहेत. यामध्ये २०१७-१८ या वर्षाचा विचार करता ७५ बालके दगावली आहेत, तर २०१९ ला ६६ बालके आणि २०२० या वर्षात ६७ बालके दगावली आहेत.
ही आहेत मृत्यूची कारणे
अँसपेक्शिया म्हणजे गुदमरून दगावलेल्या सर्वाधिक १४ बालकांचा समावेश आहे. याखालोखाल ॲस्पिरेशन न्यूमोनियाने नऊ बालके दगावली आहेत. कमी वजनाची आठ बालके व कमी दिवसांची पाच बालके दगावली आहेत. जन्मतः व्यंगाची तीन, हृदय विकाराचे दोन, हायपोथर्मियाची दोन बालके दगावली आहेत. एआरडीएसने दोन, श्वासावरोखाने तीन बालकांचा मृत्यू झाला. सेप्टिसिमियाने सहा बालके, अतिज्वराने एक, एपीलेप्सीने, अपघाताने दोन मयत झाली. हेड इंज्युरी, भाजल्याने, श्वानदंश, सर्पदंश प्रत्येकी एक आणि इतर आजाराने ११ बालके दगावलेली आहेत.
कोरोनाच्या कालावधीत दगावलेल्या बालकांची गांभीर्याने दखल घेऊन जिल्ह्यातील बालकांची आरोग्य तपासणी बालरोगतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. यासाठी ग्रामीण भागातील गावपाड्यात आरोग्य यंत्रणा तैनात केली आहे.
- डाॅ. मनीष रेंघे,
आरोग्य अधिकारी, जि.प. ठाणे