महिलेच्या पोटातून काढला १० किलोंचा पाण्याचा गोळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 12:17 PM2024-01-31T12:17:53+5:302024-01-31T12:19:05+5:30
Thane: सर्वसामान्य रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर देवदूत ठरत आहेत. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. एका महिलेच्या पोटातून दहा किलो वजनाचा पाण्याने भरलेला मांसाचा गोळा काढण्यात आला. सुमारे १२० मिनिटांच्या प्रयत्नांअंती हा गोळा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले.
ठाणे - सर्वसामान्य रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर देवदूत ठरत आहेत. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. एका महिलेच्या पोटातून दहा किलो वजनाचा पाण्याने भरलेला मांसाचा गोळा काढण्यात आला. सुमारे १२० मिनिटांच्या प्रयत्नांअंती हा गोळा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले.
उल्हासनगर परिसरात भाजी विकणाऱ्या ४८ वर्षीय महिलेच्या पोटात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून दुखत होते. परिस्थिती सामान्य असल्यामुळे खासगी रुग्णालयात पोटाची तपासणी करायची कशी, असा प्रश्न तिच्या कुटुंबाला होता. त्यामुळे दुखण्याकडे तिने दुर्लक्ष केले. मात्र, त्रास जास्त होऊ लागल्याने तिला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. २० जानेवारी रोजी पुढील उपचारासाठी तिला सिव्हील रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि पोटातून पाण्याने भरलेला मांसाचा गोळा बाहेर काढण्यात आल्याची माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रेया शेळके यांनी दिली.
महिलांच्या पोटात मांसाचा गोळा शरीरातील काही बदलामुळे होतो. पोटात सारखे दुखणे, अपचन, नैसर्गिक विधी करताना त्रास इत्यादी लक्षणे आढळतात. काहीवेळा हा गोळा कर्करोगाचाही असू शकतो. त्यामुळे या गोळ्याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवला आहे.
- डॉ. कैलास पवार,
जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे