कळवा रुग्णालयाच्या आवारात उभारले जाणार १२ मजली वैद्यकीय महाविद्यालय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 12:25 PM2023-09-01T12:25:04+5:302023-09-01T12:25:24+5:30
पालिका मुख्यालयात बुधवारी झालेल्या बैठकांमधून आयुक्त बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सुधारणा, निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाची प्रगती आणि १२ मजली वैद्यकीय महाविद्यालयाची रचना यावर चर्चा केली.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि निवासी डॉक्टरांचे वसतिगृह, तसेच वैद्यकीयमहाविद्यालय यांचे रूप पूर्णपणे पालटून उत्तम दर्जाची रुग्णसेवा आणि गुणवत्तापूर्ण सुधारित इमारत उभारण्याचे मोठे आव्हानात्मक कार्य आहे. त्यादृष्टीने प्रत्येक रुपयाचा सुयोग्य पद्धतीने वापर करून विशिष्ट कालमर्यादेत हे प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत दिले.
पालिका मुख्यालयात बुधवारी झालेल्या बैठकांमधून आयुक्त बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सुधारणा, निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाची प्रगती आणि १२ मजली वैद्यकीयमहाविद्यालयाची रचना यावर चर्चा केली.
इलेक्ट्रॉनिक प्रवेश नियंत्रण व्यवस्था राबविणार
कार्यालय अधीक्षक नेमणूक, बायोमेट्रिक हजेरी, नर्सेस आणि तज्ज्ञ डॉक्टरांची भरती असे कामकाजातील बदल केले आहेत. आता इमारतीतील सुधारणा व विस्तार याचे नियोजन सुरू करण्यात आल्याचे बांगर यांनी सांगितले.
रुग्णालयाच्या खाटांची संख्या वाढवता येईल अशी जागा निर्माण करणे, ओपीडी सुटसुटीत करणे, स्ट्रक्चरल सुधारणा करणे यासह अन्य अभ्यास करून नियोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
रुग्णालयातील इलेक्ट्रॉनिक प्रवेश नियंत्रण व्यवस्था राबविली जाईल. जेणेकरून रुग्णालयात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची नोंद होईल आणि रुग्णालयातील प्रवेशाचे नियमन होईल, असेही ते म्हणाले. रांगेत खोळंबा होण्यापेक्षा टोकन पद्धतीने वेळ दिल्यास, त्या काळात रुग्ण आणि नातेवाईक यांची बसण्याची योग्य सोय केल्यास गोंधळ कमी होईल, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.