प्रसूती झालेल्या महिलेसह एक दिवसाच्या बाळाला घेऊन डाेलीतून २ किलाेमीटरची पायपीट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 07:31 AM2022-09-15T07:31:02+5:302022-09-15T07:31:32+5:30
अनेक आदिवासी पाडे अद्याप रस्ता, वीज, पाणी, आरोग्यसारख्या सुविधांपासून वंचित आहेत. राड्याचा पाडा हा कसारा ग्रामपंचायतीच्या हद्दीत वसलेला आहे.
कसारा : देशात स्वातंत्र्याचे अमृतमहाेत्सवी वर्ष साजरे हाेत असताना मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यात आदिवासी भागात पक्के रस्तेही झालेले नाहीत. शहापूर तालुक्यातील कसाऱ्याजवळील राड्याचा पाडा येथे रस्ता नसल्याने प्रसूती झालेल्या मीना देवराम झुगरे या महिलेला मंगळवारी संध्याकाळी भर पावसातून डाेलीतून घरी आणावे लागले, तर एक दिवसाच्या बाळावर छत्री धरून दाेन किलाेमीटर पायपीट केली.
अनेक आदिवासी पाडे अद्याप रस्ता, वीज, पाणी, आरोग्यसारख्या सुविधांपासून वंचित आहेत. राड्याचा पाडा हा कसारा ग्रामपंचायतीच्या हद्दीत वसलेला आहे. या गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही. चिंचाेळ्या रस्त्याने पायपीट करून ग्रामस्थांना दवाखाना, बाजारहाटासाठी दोन ते अडीच किलोमीटर चालत जाऊन कसारा गाठण्याची वेळ येत आहे. दुचाकी या रस्त्यावरून कशीबशी
जाते.
साेमवारी मीना यांना प्रसूती वेदना जाणवू लागल्याने त्यांना घाेटी येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले हाेते. त्यावेळी दुचाकीवरून हळूहळू त्यांना मुख्य रस्त्यापर्यंत नेऊन तेथून पुढचा प्रवास करण्यात आला. या महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिला मंगळवारी संध्याकाळी घरी सोडण्यात आले. घोटी ते कसारा खासगी वाहनाने प्रवास केल्यानंतर तेथून या महिलेला तिच्या नातेवाइकांनी डोलीतून घरी नेले.
एक दिवसाच्या बाळाला घरातील व्यक्तीकडे दिले. या बाळावर छत्री धरून ८ ते ९ नातेवाइकांनी डाेलीसाेबत पायपीट सुरू केली. या दरम्यान रेल्वे ट्रॅक ओलांडून डाेंगरावरून पायवाटेने चढउतार करून त्यांनी घर गाठले.
रस्त्याचे काम अर्धवट; ताेही उखडला
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून कसारा ते राड्याचा पाडा अशा रस्त्याचे काम हाती घेतले होते. पण सरकारी उदासीनता व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ठेकेदाराने बनवलेला हा अर्धा किलोमीटरचा रस्ता उखडून गेला आहे. त्यामुळे गावात वाहन येत नसल्याने ग्रामस्थांना पायवाटेनेच इच्छित स्थळ गाठावे लागत आहे.
कसाऱ्यापासून तीन किलाेमीटर अंतरावर असलेल्या राड्याचा पाड्यात जायला रस्ता नसल्याने गैरसाेय होते. खडतर पायवाटेने प्रवास करावा लागतो. - पिंटू पारधी, ग्रामस्थ