उल्हासनगरात औषधोपचार करण्याचे आमिष दाखवून ५ महिन्याच्या मुलाचे अपहरण
By सदानंद नाईक | Published: May 3, 2024 04:26 PM2024-05-03T16:26:06+5:302024-05-03T16:27:46+5:30
कार्तिक याची तब्येत बरोबर राहत नसल्याने, त्याच्या उपचारासाठी मीना सोनावणे यांनी सोशल मीडियावर कार्तिकचा फोटो व मध्यवर्ती रुग्णालयाचे डिस्चार्ज कार्ड व्हायरल करून मदतीचे आवाहन केले.
उल्हासनगर : झुलेलाल मंदिरासमोर भिक्षा मागणाऱ्या महिलेच्या ५ महिन्याच्या मुलावर औषधोपचार करण्याचे आमिष दाखवून अपहरण केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोन महिलेवर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत होते.
उल्हासनगर कॅम्प नं-२, येथील झुलेलाल मंदिरा समोर मीना सोनावणे हया भिक्षा मागण्याचे काम करीत असून त्या म्हारळगाव येथील झोपडपट्टी परिसरात कुटुंबासह राहतात. त्यांना चैतन्य, कृष्णा, साहिल, लक्ष्मी व ५ महिन्याचा कार्तिक असे पाच मुले आहेत. कार्तिक याची तब्येत बरोबर राहत नसल्याने, त्याच्या उपचारासाठी मीना सोनावणे यांनी सोशल मीडियावर कार्तिकचा फोटो व मध्यवर्ती रुग्णालयाचे डिस्चार्ज कार्ड व्हायरल करून मदतीचे आवाहन केले. ११ फेब्रुवारी रोजी मुंबई बोरिवलीवरून स्वाती बेहरा या महिलेने मीना यांच्याशी संपर्क करून कार्तिकच्या उपचाराचे आमिष दाखविले. १२ फेब्रुवारी रोजी मीना सोनावणे, पती सुनील सोनावणे, ५ महिन्यांचा कार्तिक यांना बोरिवली येथे स्वाती बोहरा यांनी बोलावून हैद्राबाद येथे नेले.
हैद्राबाद येथे स्वाती बोहरा यांनी मीना सोनावणे यांची कृष्णाताई सुराककृष्णवेनी यांच्याशी ओळख करून दिली. तसेच कार्तिकच्या उपचारासाठी २ लाख रुपये डॉक्टराला डिपॉझिट म्हणून देऊन १३ फेब्रुवारी रोजी कार्तिकला उपचारासाठी घेऊन गेले. कार्तिकवर उपचार करण्यात येणार असून सोनावणे यांना घरी जाण्यास सांगितले. वृद्ध सासू व मुले घरी असल्याने, दगड मनावर ठेवून मीना सोनावणे ह्या पती सुनील सोनावणेसह घरी परतले. त्यानंतर कार्तिकच्या तब्येतीबाबत संपर्क केला असता, सुरवातीला प्रतिसाद दिला गेला. त्यानंतर मुलगा पाहिजे असल्यास डॉक्टरला डिपॉझिट म्हणून दिलेली २ लाख रुपये दे. अशी मागणी केली. त्यानंतर फोन बंद केल्याने, त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. अखेर मीना सोनावणे यांनी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी स्वाती बोहरा व कुष्णाताई सूराकृष्णांवेणी यांच्यावर अपहरणाचा गुन्हा बुधवारी दाखल करून कार्तिकचा तपास सुरू केला. मुलाचे अपहरण झाले की विक्री याबाबत चर्चेला ऊत आला आहे.