दहा वर्षांपासून भाईंदरमध्ये राहणाऱ्या बांगलादेशीला अटक
By धीरज परब | Published: July 31, 2023 06:37 PM2023-07-31T18:37:36+5:302023-07-31T18:37:55+5:30
भींतीपूर्वेच्या औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या बांगलादेशी नागरिकास नवघर पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे.
मीरारोड - भींतीपूर्वेच्या औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या बांगलादेशी नागरिकास नवघर पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. गेली १० वर्ष तो भारतात बेकायदा वास्तव्य करून होता. सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम सुकूंडे यांना माहिती मिळाली की, भाईंदर पूर्वेच्या मानकूबाई इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये बांग्लादेशी नागरिक येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मागर्दर्शनाखाली सुकूंडे सह अमोल पाटील व जावळे यांच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी संशयित बांग्लादेशी हा भाईंदर रेल्वे स्थानक दिशेने जाताना दिसून येताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
सोहेल अजगर शेख उर्फ सोहेल मनोवार शेख (३८) असे त्या बांग्लादेशीचे नाव असून त्याच्या कडून जप्त मोबाईल मध्ये बांगलादेशचे कोड असलेले मोबाईल क्रमांक आढळून आले. बांग्लादेशमधील गरिबी, बेरोजगारीला कंटाळून सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून तो पश्चिम बंगाल, झारखंड मध्ये राहून नंतर मुंबई परिसरात आला. गेल्या १० वर्षांपासून तो बेकायदा वास्तव्य करून असल्याचे व मजुरी काम करत असल्याचे पोलिसांना सांगितले. नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.