रेल्वे प्रवासात डोळा गमावलेल्या महिला पोलिसाला वीम्यापोटी बँकेने दिला ५० लाखांचा धनादेश
By जितेंद्र कालेकर | Published: February 3, 2023 06:06 PM2023-02-03T18:06:58+5:302023-02-03T18:07:07+5:30
ठाणे शहर पोलिस मुख्यालयाच्या नेमणूकीतील महिला पोलिस अंमलदार सुवर्णा मधे यांच्यावर शहाड ते कल्याण रेल्वे प्रवासादरम्यान कोणीतरी दगडफेक केली होती.
ठाणे: ठाणे शहर पोलिस मुख्यालयाच्या नेमणूकीतील महिला पोलिस अंमलदार सुवर्णा मधे यांच्यावर शहाड ते कल्याण रेल्वे प्रवासादरम्यान कोणीतरी दगडफेक केली होती. यात त्यांच्या उजव्या डोळयावर मार लागल्याने तो निकामी झाल्याने तो काढून टाकावा लागला. पोलिसांचे वेतन एचडीएफसी बँकेतून होत असल्याने या बँकेने एका करारांतर्गत वीम्यापोटी मधे यांना ५० लाखांचा धनादेश अपर पोलिस आयुक्त संजय जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी दिला.
पोलिस अंमलदार सुवर्णा मध्ये या २६ जुलैै २०२२ रोजी अंबिवली ते ठाणे असा उपनगरी रेल्वेने कर्तव्यासाठी येत होत्या. त्यावेळी शहाड ते कल्याण स्थानकादरम्यान दगडासारखी टनक वस्तू त्यांच्या दिशेने फेकली. हा दगड त्यांच्या उजव्या डोळयावर आपटल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना कल्याण आणि मुलूंड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतू, त्यांचा उजवा डोळा निकामी झाल्याने तो काढून टाकावा लागला होता. यात त्यांना कायमचे अपंगत्व आले.
ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाने पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचे पगार खाते एचडीएफसी बँकेत ठेवण्याबाबत करार केलेला आहे. याच करारांतर्गत पोलिस दलातील कोणत्याही कर्मचाºयास शारिरीक अपंगत्व आल्यास ५० लाखांचा वीमा बँकेने देऊ केला आहे. सुवर्णा यांचा नुकसान भरपाईचा दावा एचडीएफसी बँकेत केल्यानंतर हा दावा बँकेने तातडीने मंजूर केला. याच ५० लाखांच्या वीमा रकमेचा धनादेश ३ फेब्रुवारी रोजी अपर पोलिस आयुक्त जाधव यांच्या हस्ते देण्याचा आला. याप्रसंगी मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे, एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष संदीप कोचर, विभागीय र्प्रमुख गौतम अय्यर आणि उपव्यवस्थापक एस. कुमार जयस्वाल आदी उपस्थित होते.