शिक्षण विभागाच्या परिपत्रकाला केराची टोपली, शाळांकडून 'फी'साठी होतेय सक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 07:12 PM2022-05-12T19:12:38+5:302022-05-12T19:12:58+5:30
पालकांकडून सक्तीने एकरकमी फी वसूल करण्याचे सत्र सुरूच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
ठाणे : कोरोना काळात रोडावलेल्या आर्थिक स्थितीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना ठाण्यातील अनेक शाळांनी यंदाही फी वाढ करत एकरकमी फी भरण्याचा आग्रह पालकांकडे धरला आहे. याबाबत ठाणे पालिकेच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढत सर्वच खासगी शाळांना यंदा देखील फी पालकांकडून टप्प्याटप्प्याने घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, तरीही अनेक शाळांनी पालकांकडून जाचक पद्धतीने वर्षाची संपूर्ण फी एकदाच उकळली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याप्रश्नी खासगी शाळांनी पालकांची लूट न थांबवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मागील दोन वर्षे लॉकडाऊनमध्ये शाळा बंद होत्या. या काळात ऑनलाईन वर्ग सुरु होते. मात्र, तरीही अनेक खासगी शाळांना पालकांना जाचक पद्धतीने फी वसुलीसाठी तगादा लावला होता. हा प्रकार एकीकडे सुरु असतानाच अनेक शाळांनी पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची फी वाढ यंदा शैक्षणिक वर्षात केली. कोरोना काळात घर चालवण्यासाठी तारेवरची कसरत सुरु असताना वाढीव फी भरणे पालकांना शक्य नसल्याने त्यांनी याप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी शिक्षण विभागला निवेदन दिले होते. त्यानुसार, शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात शाळांनी टप्प्याटप्प्याने फी घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही अनेक शाळा या निर्णयाला हरताळ फासत जाचक पद्धतीने फी वसुली करत असल्याचा आरोप मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे.
परिपत्रक पालकांपर्यंत पोहचण्यात विलंब
यंदाच्या मार्च महिन्यात ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने जारी केले आहे. मात्र या परिपत्रकाचा आदेश सर्वसामान्य पालकांपर्यंत पोहचलाच नाही. अनेक शाळांनी हे परिपत्रक दडवून त्यांची आर्थिक गणित सोडवण्यात धन्यता मानल्याची माहिती मनविसे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिली.