भिवंडी न्यायालयातील लिपीकास दोन हजारांची लाच मागितल्या प्रकरणी अटक
By नितीन पंडित | Published: January 24, 2023 05:15 PM2023-01-24T17:15:16+5:302023-01-24T17:16:21+5:30
भिवंडी न्यायालयातील लिपीकास दोन हजारांची लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
भिवंडी: न्यायालयात दाखल प्रकरणाचे नंबरींग करण्यासाठी दोन हजारांची लाच मागितल्या प्रकरणी ठाणे लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत भिवंडी सह दिवाणी न्यायालयातील लिपिकास मंगळवारी अटक केली आहे .सरफराज शेख असे अटक आरोपीचे नाव आहे.
भिवंडी सह दिवाणी न्यायालयात लिपिक म्हणून कार्यरत सरफराज शेख यांनी तक्रारदाराकडे प्रकरण नंबरींग करण्यसाठी लाच मागितली असता, तक्रारदाराने या बाबत ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.चार प्रकरणावर नंबरींग करून पुढील कार्यवाही करण्याकरीता १५ जानेवारी रोजी पडताळणी कारवाई वेळी तक्रारदारकडे स्वतः करीता प्रत्येक प्रकरणाची पाचशे रुपये प्रमाणे एकूण दोन हजार रुपये लाचेच्या रक्कमेची मागणी केली.
तर १६ जानेवारी रोजी सापळा कारवाई करताना आरोपी लिपिकाने आपल्यासह मॅडम यांच्यासाठी पाचशे रुपये अशी लाच मागितली.परंतु त्यावेळी संशय आल्याने लिपिक सरफराज शेख याने तक्रारदाराकडुन लाच स्वीकारली नाही. या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत लिपिक सरफराज शेख या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी दिली आहे.