हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट: ९ दिवसांपूर्वी रोहितला वाचवणेच आरतीच्या बेतले जिवावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 06:04 AM2024-06-20T06:04:08+5:302024-06-20T06:04:43+5:30
आरतीने पोलिसांपासून प्रेमसंबंध असल्याचे लपवून ठेवत मोबाइलचे प्रकरण मिटवून घेऊ, असे सांगत पोलिसांना कारवाईपासून रोखले नसते, तर कदाचित तिचा जीव वाचला असता.
मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : नऊ दिवसांपूर्वी २२ वर्षीय आरती यादवने आरोपी रोहित यादवला आचोळे पोलिसांपासून वाचविले होते. त्याला वाचविण्याचे आरतीच्या जिवावर बेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी रोहितने मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती कामावर जात असताना रस्त्यात गाठून लोखंडी पान्याने १५-१६ वार करून तिची निर्घृण हत्या केली. आरतीने आचोळा पोलिसांपासून प्रेमसंबंध असल्याचे लपवून ठेवत मोबाइलचे प्रकरण मिटवून घेऊ, असे सांगत पोलिसांना कारवाईपासून रोखले नसते, तर कदाचित तिचा जीव वाचला असता.
सहा वर्षांपूर्वी संतोष भवन परिसरात आरती आणि रोहित आजूबाजूला राहण्यासाठी आले. तेथूनच दोघांची ओळख झाली व त्याचे रूपांतर प्रेमात झाले. तीन वर्षांपूर्वी दोघांनी आपल्या घरच्यांना याबाबत सांगून लवकरच लग्न करणार असे सांगितले होते. त्यानंतर आरती ही अलीकडेच संतोष भवन येथून आचोळ्याच्या शिर्डीनगर परिसरात राहण्यासाठी आली
होती. मात्र, महिनाभरापूर्वीच दोघांचेही ब्रेकअप झाले होते.
आरतीनेच पोलिसांना कारवाईपासून रोखले
- रोहित तिच्यासोबत बोलण्यासाठी मोबाइलवर फोन करायचा, पण ती उचलत नव्हती. म्हणून ८ जूनला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याने शिर्डीनगर परिसरात येऊन भांडण करत आरतीचा मोबाईल फोडला होता. त्यानंतर हा वाद आचोळा पोलिस ठाण्यात पोहोचला होता.
- पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून ९ जूनला सकाळी हजर राहण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी आरोपीला पोलिसांनी खाक्या दाखविण्यास सुरुवात केल्यावर आरतीने पोलिसांना थांबविले व कारवाई करू नका, म्हणून विनंती केली.
आरोपीला पोलिस कोठडी
नालासोपारा : कामावर जाणाऱ्या आरती यादव हिची सर्वांसमक्ष दिवसाढवळ्या हत्या करणारा आरोपी रोहित यादव याला बुधवारी वसई सत्र न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वालीव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांनी आरोपीला बुधवारी दुपारी वसई दिवाणी न्यायालयातील न्यायाधीश जी. जे. सुंदर यांच्यापुढे उभे केले. आरोपीला त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. या निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात अपील करण्यात आले. तेथील न्यायाधीश जयेंद्र जगदाळे यांनी दिवाणी न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे ओढले आणि १० मिनिटांच्या युक्तिवादानंतर आरोपी रोहित यादवला २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
ती उत्तर प्रदेशची, तो हरियाणाचा
२२ वर्षीय आरती यादव ही आचोळे रोडवरील शिर्डीनगर परिसरात परिवारासह राहत होती. ती मूळची उत्तर प्रदेशमधील राहणारी होती, तर आरोपी रोहित यादव हा संतोष भवनच्या कारगीलनगर परिसरात राहत होता. तो मूळचा हरियाणातील राहणारा आहे.