लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलगा व तरुणीची अग्निशमन दलाने केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 05:05 PM2022-10-04T17:05:44+5:302022-10-04T17:06:48+5:30
कनकीया भागात रश्मी प्राईम कॉर्नर नावाची ७ मजली इमारत आहे.
मीरारोड - मीरारोड मधील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या १५ वर्षीय मुलगा व २२ वर्षीय तरुणीची अग्निशमन दलाने सुटका केली. इमारतीची लिफ्ट सातत्याने नादुरुस्त होत असल्याचे समोर आल्याने अग्निशमन दल नोटीस बजावणार असून शासनाच्या संबंधित विभागास सुद्धा कळवण्यात आले आहे.
कनकीया भागात रश्मी प्राईम कॉर्नर नावाची ७ मजली इमारत आहे. सदर इमारतीत राहणारा १५ वर्षीय आदम सिमेंटवला व २२ वर्षीय सारा हे सोमवारच्या मध्यरात्री नंतर साडे बाराच्या सुमारास लिफ्ट मधून चालले होते. त्यावेळी पहिला मजला आणि तळ मजला दरम्यान लिफ्ट बंद पडली.
आदम यांनी वडील ओझेफा यांना कळवल्यानंतर ते सुद्धा खाली आले. परंतु लिफ्ट सुरू होत नसल्याने त्यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलास कळवले. कॉल येताच कनकीया अग्निशमन केंद्रातील लिडिंग फायरमन संजयकुमार पाटील सह भास्कर नांगरे, हनुमंत भोसले, मितेश पाटील, चेतन ठाकूर, तिकेश पाटील असे पथक घटनास्थळी दाखल झाले.
आयुक्त बंगल्या समोरून अग्निशमन दलाचे वाहन सायरन वाजवत गेल्याचे पाहून आयुक्त दिलीप ढोले यांनी घटनेची माहिती घेतली. मुलं लिफ्टमध्ये अडकल्याचे समजल्यावर अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांना त्यांनी कॉल करून जातीने मदतकार्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. मीरारोड पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले.
जवानांनी लिफ्ट बाहेरची लोखंडी जाळी कापली व संजयकुमार हे आत लिफ्टमध्ये उतरले. त्यांना लिफ्ट थेट सुरू करण्याची माहिती असल्याने त्यांनी वायरी जोडून ती सुरू केली व लिफ्ट खाली आली अशी माहिती अग्निशमन दलाने दिली. सुमारे तासा भराने आदम व सारा यांची सुखरूप सुटका झाल्याने रहिवाश्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सदर लिफ्टची देखभाल दुरुस्ती नियमित केली जात नसल्याने ती सारखे बंद पडत असते असे समजल्यावर ठाणे येथील लिफ्ट विभागाशी संबंधित शासकीय कार्यालयास कळवले आहे. अग्निशमन दलाच्या वतीने सुद्धा गृहनिर्माण संस्थेला नोटीस बजावणार आहोत असे प्रकाश बोराडे यांनी सांगितले. या घटनेने लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकार चर्चेत आले आहे