आई-वडिलांना भेटायला गेलेल्या वीटभट्टी मजुरास मालकाकडून मारहाण
By नितीन पंडित | Updated: January 9, 2024 19:45 IST2024-01-09T19:43:27+5:302024-01-09T19:45:39+5:30
वीटभट्टी मालकाविरोधात गुन्हा दाखल

आई-वडिलांना भेटायला गेलेल्या वीटभट्टी मजुरास मालकाकडून मारहाण
भिवंडी: तालुक्यात वीट भट्टी वरील आदिवासी मजुरांना वेठबिगार म्हणून राबवून घेण्याच्या घटना समोर येत असतानाच तालुक्यातील वाघिवली येथील वीटभट्टी मजूर सुट्टीच्या दिवशी नजीकच्या गावात वीट भट्टीवर काम करणाऱ्या आपल्या आई-वडिलांना भेटायला गेल्याच्या रागातून वीटभट्टी मालकाने मजुरास जबर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात वीटभट्टी मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कालू वाघ असे मारहाणीत जखमी वीटभट्टी मजुराचे नाव आहे.
तालुक्यातील वाघिवली येथील वीटभट्टी मालक दिनेश पाटील यांच्या वीटभट्टीवर वाडा तालुक्यातील जमभुळवाडी कोने या गावातील कालू वाघ आपल्या पत्नीसह काम करीत आहे.तर त्याचे आई वडील कवाड येथील बजरंग माळी यांच्या वीटभट्टीवर काम करतात. २२ डिसेंबर रोजी कालू हा कवाड येथील आपल्या आजारी असलेल्या आईला भेटायला गेला होता.याचा राग मनात ठेऊन मालक दिनेश पाटील याने कालू यास लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. यामध्ये त्याच्या हाताला जबर मार लागल्याने हात सुजला होता.त्यानंतर मालकाने कवाड येथे खाजगी रुग्णालयात उपचार करून त्यास पुन्हा कामाला जुपले.या बाबतचा त्रास असह्य झाल्याने त्याने श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिल्या नंतर विवेक पंडित यांनी वीटभट्टीवर स्वतः धाव घेतली. त्यांनतर श्रमजीवी कार्यकर्त्यांनी कालूसह भिवंडी तालुका पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य तपासून वीटभट्टी मालक दिनेश पाटील या विरोधात मारहाणी सह वेठबिगार मुक्ती कायदा व अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.