उत्तन समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्याचे आवाहन
By धीरज परब | Published: April 23, 2023 06:33 PM2023-04-23T18:33:16+5:302023-04-23T18:33:39+5:30
स्थानिक जागरूक नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांनी देखील आठवड्यातून २ वेळा स्वच्छता मोहीम राबवून किनारा स्वच्छ - सुंदर ठेवण्याचे आवाहन मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.
मीरारोड - भाईंदरच्या उत्तन ते चौकपर्यंतचा समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका कार्य करत आहे. मात्र स्थानिक जागरूक नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांनी देखील आठवड्यातून २ वेळा स्वच्छता मोहीम राबवून किनारा स्वच्छ - सुंदर ठेवण्याचे आवाहन मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.
उत्तनच्या वेलंकनी तीर्थमंदिर जवळील समुद्र किनारा स्वच्छतेची मोहीम महापालिकेने राबवली होती. या मोहिमेत
अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त रवि पवार व कल्पिता पिंपळे सह पालिकेचे अधिकारी - कर्मचारी सहभागी झाले होते. किनाऱ्यावरचा प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, रॅपर, गोणी, कपडे आदी विविध प्रकारचा कचरा गोळा करण्यात आला. यावेळी शासना कडून मिळालेल्या यंत्राच्या सहाय्याने देखील वाळूत रुतलेला कचरा उकरून काढण्यात आला.
समुद्रात किंवा समुद्रकिनारी अस्वच्छता बेजबाबदार लोकां कडून पसरविली जात असून समुद्र प्रदूषित होऊन त्याचा परिणाम जलचरांवर होतो. पर्यावरण प्रदूषित होते. त्यामुळे नागरिकांनी कचरा केवळ कचरा पेटीत टाकणे व किनारा स्वच्छ ठेवणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे आयुक्त यांनी सांगितले.