गणशोत्सवाचा बॅनर फाडल्यानं शिवसैनिकाच्या विरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 11:12 AM2022-08-31T11:12:51+5:302022-08-31T11:13:16+5:30
अंबरनाथच्या चिंचपाडा परिसरात मंगळवारी सायंकाळी गणेशोत्सवाचा बॅनर फाडल्याप्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्याविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अंबरनाथच्या चिंचपाडा परिसरात मंगळवारी सायंकाळी गणेशोत्सवाचा बॅनर फाडल्याप्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्याविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
अंबरनाथ येथील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या विकास सोमेश्वर या शिवसैनिकाने याच परिसरात एका मंडळाने लावलेला बॅनर काढून त्या बॅनरला लाथ मारल्याने या परिसरातील नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. बॅनर फाडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विकास सोमेश्वर याच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी अंबरनाथ मधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गर्दी केली होती. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनच्या बाहेर जाणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली.
पोलीस ठाण्याच्या बाहेर वातावरण तंग झाल्याने हा जमाव परतवण्यासाठी पोलिसांना देखील मोठी कसरत करावी लागली. अखेर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याने याप्रकरणी विकास सोमेश्वर याच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करताच विकास सोमेश्वर याला पोलिसांनी अटक केली आहे.