शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल, गटात सामिल होण्यासाठीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 05:34 AM2022-07-24T05:34:57+5:302022-07-24T05:35:31+5:30
महापालिकेचे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोडबंदर रोड, कोठारी कंपाऊंड भागातील गोदामात अनधिकृतपणे हुक्का पार्लर आणि बार चालवल्याबद्दल शिवसेना महिला आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकारी समिधा मोहिते यांचा मुलगा श्रद्धेश मोहिते याच्या विरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. राजकीय आकसातूनच ही कारवाई केल्याचा आरोप मोहिते यांनी केला.
महापालिकेचे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला. समिधा मोहिते यांनी झुणका भाकर केंद्राच्या नावावर उपाहारगृह सुरू ठेवल्याप्रकरणी महापालिकेने अलीकडेच एमआरटीपीअंतर्गत कारवाई सुरू केली होती. ठाण्यातील यिक्की वाईन व माटो माटो या बारवरही कारवाई करण्यात आली. हा बार समिधा यांचा मुलगा श्रद्धेश याचा आहे. येथे उघड्यावर दारू विक्री केली जाते व हुक्का पार्लर सुरू असल्याने ही कारवाई केल्याचे पालिकेने सांगितले. शुक्रवारी महापालिकेने मानपाडा येथील कोठारी कंपाऊंड भागात असलेल्या वाणिज्य गोदामातील एमएच ०४ ड्रंक यार्ड नावाने सुरू असलेल्या अनधिकृत हुक्का पार्लर, बार आणि रेस्टॉरंट यावर कारवाई करण्याकरिता श्रद्धेश मोहिते, विहार पायमोडे, सोहम जोशी आणि स्वप्नील ठोसर या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक दशरथ पालांडे यांच्या मुलावर बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी एमआरटीपीखाली कारवाई झाली.
समिधा मोहिते यांनी अद्याप शिंदे गटाला पाठिंबा दिलेला नाही. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या गटात सामील व्हावे याकरिता ही कारवाई सुरू असल्याचा दावा मोहिते करीत आहेत.