संतापजनक! बदलापुरातील 'त्या' दोन कार्यकर्त्या महिलांवरच गुन्हा दाखल; तोडफोड करणाऱ्यांच्या यादीत नावे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 11:21 AM2024-08-26T11:21:37+5:302024-08-26T11:21:50+5:30
शाळा, पोलिसांच्या दबावाला बळी न पडता मुलींचे पालक गुन्हा दाखल करण्यावर ठाम राहिल्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : मुलींवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुलींच्या पालकांना मदत करणाऱ्या दोन महिला सामाजिक कार्यकर्त्यांनाच पोलिसांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने संताप व्यक्त होत आहे. या दोन महिला कार्यकर्त्यांवर शाळेत तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण दडपण्याचा पोलिस आणि शाळा व्यवस्थापनाचा प्रयत्न होता. मात्र, दबावाला न जुमानता पालकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे संपूर्ण देशाला हादरवरून टाकणारा हा गुन्हा उघडकीस आला. शाळेत अत्याचाराची घटना घडल्यानंतर पालकांनाही घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शाळा, पोलिसांच्या दबावाला बळी न पडता मुलींचे पालक गुन्हा दाखल करण्यावर ठाम राहिल्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली.
नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणारे पोलिसच या प्रकरणात कच खात होते. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा म्हणून मनसेच्या स्थानिक नेत्या संगीता चेंदवणकर यांनी मोलाचा वाटा उचलला. पीडित मुलीला त्यांनीच धीर दिला. तसेच पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.
...अन्यथा हा गुन्हा दडपला असता
गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिस संथपणे चौकशी करीत होते. संगीता चेंदवणकर यांच्या मदतीला मग इतर महिला कार्यकर्त्याही पुढे सरसावल्या होत्या. त्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्या तरी त्यांनी आपला पक्ष बाजूला ठेवला आणि घडलेल्या प्रकाराविरोधात बदलापूरकरांना संघटित केले होते. प्रियांका दामले यांनीही या प्रकरणात प्रशासनाला धारेवर धरले होते. संगीत चेंदवणकर आणि प्रियांका दामले यांच्यामुळेच बदलापूरकर रस्त्यावर उतरले. ते उतरले नसते तर हा गुन्हा दडपला गेला असता, असे म्हटले जाते.
चेंदवणकर, दामलेंवरील गुन्हा मागे घ्या
पोलिस पीडित मुलीच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत करीत नव्हते. त्यावेळी संगीता चेंदवणकर आणि प्रियांका दामले या दोन कार्यकर्त्या त्यांच्यामागे भक्कमपणे उभ्या राहिल्या होत्या. या दोघींवर शाळेत तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.