भिवंडीत कापड व्यवसायिकाची सव्वा दोन कोटींची फसवणूक, १२ जणांविरुद्ध गुन्हा
By नितीन पंडित | Published: October 19, 2023 04:17 PM2023-10-19T16:17:48+5:302023-10-19T16:18:13+5:30
या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार हे करीत आहेत.
भिवंडी: कपडा व्यवसायिका चा विश्वास संपादन करून खोटे धनादेश देत त्याकडील सव्वा दोन कोटी रुपयांचा कपडा घेऊन फसवणूक केल्याची घटना भिवंडीत समोर आली आहे.या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या बारा जणांविरोधात बुधवारी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींमध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे.
कशेळी येथील राजलक्ष्मी कमर्शियल कॉम्प्लेक्स याठिकाणी श्रीराम गोयल यांची टॉपमेन इंटरनॅशनल नावाची कपडा उत्पादक कंपनी आहे.त्याठिकाणी शापौस सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीतील प्रतिनीधी सौरभ कुमार अग्रवाल व त्याचे साथीदार जॉन टेलर डे,मयांक तिवारी,सुप्रिया मुन्शी,मुकेश शर्मा,ऋची त्रिपाठी, ऋषीकांत पासवान,विक्रांत कुमार,दास राजदिप सुप्रम,संजीत नारायण,अंकुर मिश्रा,गगनदिप सैनी या बारा जणांनी आपापसात संगनमत करून ९ ऑक्टोंबर २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीत जाणीवपूर्वक फसवणुक करण्याचे उद्देशाने त्यांचे बँक खात्यात रक्कम नसतांनाही खोट्या सहयांचे धनादेश चेक देवून २ कोटी २५ लाख ३९ हजार ६२६ रुपये किमतीचा कपडा खरेदी केला.परंतु धनादेशाचे पैसे तगादा करून ही न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर श्रीराम किशनस्वरूप गोयल यांनी नारपोली पोलिस ठाण्यात धाव घेत या बारा जनांविरोधात तक्रार दिली.नारपोली पोलिसांनी या बारा जणां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार हे करीत आहेत.