भिवंडीत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
By नितीन पंडित | Published: January 16, 2023 04:30 PM2023-01-16T16:30:45+5:302023-01-16T16:45:14+5:30
भिवंडी - महाराष्ट्रामध्ये पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरू नये याकरता नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असताना सुद्धा त्याचा सर्रासपणे वापर ...
भिवंडी - महाराष्ट्रामध्ये पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरू नये याकरता नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असताना सुद्धा त्याचा सर्रासपणे वापर केला जात असल्याचे ठिकठिकाणी आढळून आले आहे. भिवंडी शहरात मकर संक्रांतीच्या दिवशी हिंदुहृदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरून जाणाऱ्या एका ४७ वर्षीय व्यक्तीचा गळा नायलॉन मांजामुळे चिरून बळी गेल्याची घटना ताजी असताना भिवंडी शहरात भोईवाडा पोलीस स्टेशन हद्दीत भुसार मोहल्ला या ठिकाणी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरोधात रविवारी भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे.
प्रभाकर विजयमल्लेश शेरला असे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्या जवळून २५ हजार १०० रुपये किमती चा नायलॉनचा मांजा जप्त करण्यात आला आहे.भिवंडी गुन्हे शाखेचे शशिकांत यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलीस ठाणे येथे बंदी असताना नायलॉन मांजाचा साठा करून सार्वजनिक उपद्रव करीत गुरांना पक्ष्यांना तसेच मानवी जीवितास इजा होण्याचा धोका निर्माण केला म्हणून मांजा विक्रेता प्रभाकर शेरला विरोधात गुन्हा दाखल केला आहे.