बड्या कार डीलरची मालमत्ता बनावट कागदांनी बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2022 11:15 AM2022-12-27T11:15:29+5:302022-12-27T11:15:46+5:30
काशीमीरा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
धीरज परब
मीरारोड - एका बड्या कार डिलर्सची बँकेने जप्त केलेली मालमत्ता डोसवण्यासह कर्ज फेडीसाठी ३० कोटी रुपये तसेच इमारत विकसित करून त्यात ७० टक्के वाटा देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
जुहूला राहणारे राधेश्याम व पत्नी सुभद्रा गुप्ता यांची काशीमीरा पोलीस ठाण्या जवळ लक्ष्मी आर्केड नावाने मारुतीचे लक्ष्मी कार नावाने शोरूम होते . आयसीआयसीआय बँकेचे १० कोटी २६ लाखांचे कर्ज न भरल्याने बँकेने न्यायालयात दावा दाखल केला व मालमत्ता सील केली आहे.
गुप्ता यांच्या फिर्यादी नुसार इस्टेट एजंट शकील खान याने गुप्ता यांची ओळख क्रोनोज ग्लोबल इन्व्हेस्टमेंट चे अझर शकूर यांच्याशी मालाड येथील कार्यालयात ओळख करून दिली होती . शकुर व गुप्त्या यांनी समझोता करार केला व त्यात शकूर हा गुप्ता यांना कर्ज आदी फेडण्यासाठी ३० कोटी देणार तसेच नवीन इमारत उभारून त्यातील ७० टक्के वाटा गुप्ता यांना देणार असे ठरले . दरम्यान गुप्ता यांच्या मुलीच्या लग्ना वेळी शकूर यांनी ४८ लाख दिले तसेच मुलीला सोन्याचा हार दिला होता.
शकुर याने ३० कोटी दिले नाही उलट इमारतीवर स्वतःच्या कंपनीचे नाव लावून १० कोटी रुपयांचा आयपीओ काढला. दरम्यान शकुर ह्याने ठाणे न्यायालयात गुप्ता यांच्या मालमत्तेबाबत दावा दाखल केला आहे व त्यात २००८ चे बनावट कागदपत्र व बनावट सह्या आदी करून ५ कोटी दिल्याचे नमूद असल्याची माहिती मिळाली. गुप्ता यांनी वकील मार्फत शकूर याच्या दाव्याबाबत न्यायालयात अर्ज दाखल केला व कागदपत्र बनावट असून ५ कोटी मिळाले नसल्याचे स्पष्ट केले.
बनावट करारनाम्याचा वापर करून शकूर, दिव्या मोज्जडा व मोहम्मद इकबाल सादिक यांनी मिळून नवीन वीज मीटर मिळवले. या सर्व प्रकरणी गुप्ता यांच्या फिर्यादी वरून शकुर, दिव्या व सादिक यांच्यावर २३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत .