बलात्कार पीडित महिला पोलिसावर आरोपी पोलिसाच्या फिर्यादी नंतर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
By धीरज परब | Published: May 8, 2023 08:09 PM2023-05-08T20:09:31+5:302023-05-08T20:09:43+5:30
तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या निर्देशा नंतर वाघ याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
मीरारोड - बलात्कार पीडित महिला पोलिसावर आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून नयानगर पोलिसांनी एट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस हवालदार प्रेमसागर वाघ विरुद्ध दिलेल्या तक्रारी नंतर नवघर पोलिसांनी बलात्कार सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. वाघ हा गुन्हा दाखल झाल्या नंतर पसार झाला होता. तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या निर्देशा नंतर वाघ याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. तर दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी वाघ याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
पोलिसांनी वाघ याची विभागीय चौकशी सुरु करून चौकशी अधिकारी म्हणून नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना नेमले होते . २१ एप्रिल २०२२ रोजी चौकशी कामी पीडित महिला पोलीस यांना नया नगर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते.
त्यावेळी पीडित महिला पोलीसाने आपणा सोबत भांडण करून तुझ्या व तुझ्या मुलांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करेन, कुटुंबाला संपवून टाकेन अशी धमकी दिल्याची अदखलपात्र तक्रार वाघ याने नया नगर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्या घटनेनं नंतर पीडितेने वाघ व मुलाविरुद्ध ईमेलद्वारे तक्रार केली होती.
पीडितेस आपण अनुसूचितचा असल्याचे माहिती असून सुद्धा खोटी तक्रार करून अपमान केला तसेच मला व कुटुंबास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व जीवितास धोका निर्माण करण्याची शक्यता असल्याची फिर्याद वाघ याने दिल्या नुसार ६ मे रोजी पीडितेवर एट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या प्रकरणी सहायक आयुक्त विलास सानप हे तपास करणार आहेत. बलात्कार पीडितेवरच एट्रोसिटीचा गुन्हा आरोपीच्या तक्रारीवरून तोही एक वर्षानंतर दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .