१० रुपये कमी करा सांगितले म्हणून जातीवाचक शिवीगाळ, किराणा दुकानदाराविरोधात एट्रोसिटीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 11:02 AM2022-12-27T11:02:08+5:302022-12-27T11:03:51+5:30
नवघर पोलिसांनी दुकानदारावर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
धीरज परब
मीरारोड - किराणा दुकानदारास किराणा सामनाचे १० रुपये कमी करा सांगितले म्हणून दुकानदाराने जातीवाचक शिविगाळ केल्याच्या तक्रारी वरून नवघर पोलिसांनी दुकानदारावर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
मीरारोडच्या मेडतीया नगर भागात मगर पवार यांचे पवार फुटवेअर नावाचा व्यवसाय आहे . २१ डिसेंबरच्या रात्री घरी जात असताना जवळच्या अंबिका कॉम्प्लेक्स मधील वंदना किराणा भांडार ह्या दुकानातून तेल व मसाला खरेदी साठी ते गेले. दुकानातील विक्रेत्याने २४० रुपये झाल्याचे सांगितले असता पवार यांनी २३० रुपये घ्या असे म्हटले.
विक्रेत्याने पैसे कमी होणार नाही सांगितल्यावर पवार यांनी सामान नको म्हणत दुकाना बाहेर आले. त्यावेळी त्या विक्रेत्याने जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. तर विक्रेत्याच्या पत्नीने गाडून टाकेन , तुझे दुकान हटवून टाकेन असे धमकावल्याचे पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे . पोलिसांनी २२ डिसेंबर रोजी विक्रेत्यासह त्याच्या पत्नी वर एट्रोसिटी व अन्य कलमाखाली गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले तपास करत आहेत .