उल्हासनगरमध्ये ओमी कलानी यांच्यासह दोघांवर ५० लाख खंडणीचा गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Published: December 3, 2022 02:43 PM2022-12-03T14:43:34+5:302022-12-03T14:44:46+5:30
पोलिसांनी मंत्र्यांच्या दबावाखाली खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप ओमी कलानी यांनी करून पोलिसांविरोधात दंड ठोठावले.
उल्हासनगर - माजी आमदार पप्पु कलानी यांचा मुलगा व राष्ट्रवादीचे युवानेते ओमी कलानी यांच्यासह एकावर ५० लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. तर पोलिसांनी मंत्र्यांच्या दबावाखाली खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप ओमी कलानी यांनी करून पोलिसांविरोधात दंड ठोठावले.
उल्हासनगर कॅम्प नं-२ नेहरू चौक परिसरात भाजपचे माजी नगरसेवक व एकेकाळी पप्पु कलानी यांचे कट्टर समर्थक असलेले राजेश वधारीया यांचा मुलगा धीररेन वधारीया यांनी कृष्णा निवास को ऑफ सोसायटी नावाची तळमजला अधिक तीन मजले इमारत बांधून इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला. मात्र त्यावेळी तत्कालीन महापौर पंचम कलानी यांनी इमारत अवैध असून कारवाई करण्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती. दरम्यान राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार इमारतीला वाढीव चटईक्षेत्र मिळत असल्याने, वधारीया यांनी महापालिका नगररचनाकार विभागाकडे रिवाईज्ड प्लॅन मंजुरीसाठी टाकला. मात्र इमारतीच्या रिवाईज्ड प्लॅनला मंजुरी देऊ नका. अशी भूमिका ओमी कलानी यांनी घेऊन, नगररचनाकार विभागाकडे पत्रव्यवहार केला. त्यामुळे अद्याप पर्यंत इमारतीचा रिवाईज्ड प्लॅन मंजूर झाला नाही.
गुरवारी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान टीम ओमी कलानी यांच्या लेटरपॅडवर नोटीस घेऊन एक इसम कृष्णा निवास को ऑफ सोसायटी इमारत मध्ये गेला. त्याने इमारत अवैध असल्याची नोटीस इमारत मधील ऑफीसवाल्या मधील नागरिकांना दिली. यावेळी धीरेन वधारीया तेथे आले असता, त्यांच्याकडे इमारतीवर कारवाई न होण्यासाठी ५० लाखाची मागणी केली. असा आरोप धीरेन वधारीया यांनीं केला. सुरवातीला उल्हासनगर पोलिसांनी याबाबतची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्यावर, राजेश वधारीया यांनी केबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांना सर्वप्रकार सांगितला. त्यानंतर चक्रे जलद फिरली. आमदार आयलानी यांनी पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर, शुक्रवारी उल्हासनगर पोलिसांनी ओमी कलानी यांच्यासह एका इसमावर खंडणीचा गुन्हा दाखल केला.
कृष्णा निवास इमारत अवैध?
कृष्णा निवास इमारतीची बांधकाम परवानगी बेसमेंट अधिक तीन मजले असताना, इमारत बेसमेंट शिवाय उभी राहिली. तत्कालीन महापौर पंचम कलानी यांनी कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान इमारतीला पूर्णत्वाचा दाखला मिळून, नवीन नियमानुसार रिवाईज्ड बांधकाम परवाण्यासाठी वधारीया यांनी प्रस्ताव टाकला. याप्रस्तावाला ओमी कलानी यांनी विरोध केला. महापालिका नगररचनाकार विभागाशी संपर्क झाला नाही.