मीरा भाईंदर मधील १४ अतिधोकादायक तर १९ धोकादायक इमारती रिक्त करण्याचे पालिकेसमोर आव्हान
By धीरज परब | Published: May 3, 2023 07:47 PM2023-05-03T19:47:45+5:302023-05-03T19:48:06+5:30
मीरा भाईंदर महापालिकेने पावसाळ्या आधी तोडणे आवश्यक असलेल्या अतिधोकादायक अशा १४ इमारतींची यादी जाहीर केली आहे.
मीरारोड : मीरा भाईंदर महापालिकेने पावसाळ्या आधी तोडणे आवश्यक असलेल्या अतिधोकादायक अशा १४ इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्या शिवाय इमारत रिकामी करून दुरुस्ती करणे आवश्यक असलेल्या इमारतींची संख्या १९ आहे. अतिधोकादायक इमारती पावसाळ्या आधी रिकाम्या करण्याचे आव्हान पालिके समोर असून अन्य धोकादायक इमारतींना बाबत पालिकेच्या भूमिके कडे लक्ष लागले आहे.
मीरा भाईंदर मध्ये ग्रामपंचायत व नगर परिषद काळा पासून असलेल्या जुन्या इमारतींची संख्या मोठी आहे. पावसाळ्यात धोकादायक व जुन्या इमारतींच्या दुर्घटना घडत असून काही प्रकरणात लोकांचे बळी गेले आहेत. यंदाच्या पावसाळ्या आधी महापालिकेने शाहजरातील जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास सांगितले होते. त्याच्या अहवाला नुसार पालिकेने शहरातील एकूण ४२९ इमारतींची यादी विविध श्रेणी नुसार तयार केली आहे.
अतिधोकादायक स्वरूपातील १४ इमारतीची यादी पालिकेने जाहीर केली आहे. प्रभाग समिती १ व ४ मध्ये प्रत्येकी १ इमारत, प्रभाग समिती २ व ६ मध्ये प्रत्येकी ४ इमारत तर प्रभाग समिती ३ मध्ये ५ अशा एकूण १४ अतिधोकादायक इमारती पालिकेने जाहीर केल्या आहेत. त्यापैकी २ इमारती तोडल्या असून ३ इमारती तोडण्याचे काम सुरु आहे. रिकामी केलेली १ इमारत असून रहिवासी व्याप्त पण रिक्त करण्याचे काम सुरु असलेल्या ५ इमारती आहेत. तर ४ अतिधोकादायक इमारतींना न्यायालय कडून स्थगिती आदेश मिळाला आहे.
या शिवाय इमारत रिकामी करून दुरुस्ती करण्या योग्य १९ इमारती आहेत. इमारत रिकामी न करता दुरुस्ती होणाऱ्या इमारतींची संख्या ३८३ असून किरकोळ दुरुस्ती आवश्यक असलेल्या इमारतींची संख्या १३ आहे. पावसाळा सुरु होण्याआधी अतिधोकादायक इमारती पाडून घेणे आवश्यक आहेच. पण ज्या १९ धोकादायक इमारती रिकाम्या करून दुरुस्ती करण्यायोग्य आहेत त्या बाबत पालिकेचे भूमिका अजून जाहीर झालेली नाही. रहिवास व्याप्त धोकादायक इमारती ह्या चिंतेचा विषय असून त्या रिकाम्या करणे अवघड ठरते. पालिका धोकादायक इमारत रिकामी न केल्यास पोलीस बंदोबस्तात ती खाली करण्याचे नोटीस द्वारे बजावत असतात.