अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार
By जितेंद्र कालेकर | Published: September 24, 2024 10:31 PM2024-09-24T22:31:45+5:302024-09-24T22:33:18+5:30
हे संपूर्ण प्रकरण आता चौकशीच्या अधीन असल्यामुळे यावर अधिकृतपणे बोलता येणार नसल्याचे ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी स्पष्ट केले.
ठाणे : बदलापूर लैंगिक छळवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या पोलिस चकमकीतील मृत्यूची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) तसेच न्यायालयीन चौकशी केली जाणार असल्याची माहिती ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी मंगळवारी दिली. हे संपूर्ण प्रकरण आता चौकशीच्या अधीन असल्यामुळे यावर अधिकृतपणे बोलता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, जे घडले, ते धक्कादायक असून, अक्षयने पोलिसांवर केलेल्या गोळीबारासाठी त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा आणि त्याच्या आकस्मिक मृत्यूचा असे दोन गुन्हे मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल झाल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
अक्षयवरील लैंगिक छळवणुकीच्या गुन्ह्याचा तपास राज्य शासनाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) सुरु होता. त्याच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्यावर केलेल्या अनैसर्गिक लैंगिक छळवणुकीच्या आरोपाची ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरु होती. याच गुन्ह्यात त्याचा तळोजा कारागृहातून सोमवारी ताबा घेतल्यानंतर हा चकमकीचा प्रकार घडल्याची माहिती ठाणे पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी यांनी दिली. पोलिसांचे वाहन मुंब्रा बायपास येथे आले असता, आरोपी अक्षयने सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तूल खेचले. त्यानंतर पोलिसांच्या दिशेने तीन राऊंड फायर केले. त्यापैकी एक गोळी मोरे यांच्या मांडीला लागली.
स्वसंरक्षणार्थ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयच्या दिशेने एक गोळी झाडली. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा कळवा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मुंब्रा पोलिस ठाण्यात अक्षय याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा आणि त्याचा आकस्मिक मृत्यूचा असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. याच संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत तसेच न्यायालयीन चौकशीची मागणी करणारे पत्र संबंधित यंत्रणांना दिले असून, हे प्रकरण आता सीआयडीकडे वर्ग केल्याची माहिती डुंबरे यांनी दिली.
घटनास्थळी न्यायवैद्यक पथक
पोलिस गोळीबारात अक्षय मृत पावलेल्या मुंब्रा बायपास याठिकाणी तसेच ज्या वाहनांत हा थरार घडला त्या पोलिस वाहनाची तसेच घटनास्थळाचा मुंब्रा पोलिसांनी पंचनामा केला. त्याठिकाणी न्यायवैद्यक विभागाकडूनही पाहणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.