मृत्यू समोर दिसत असतानाही सोडली नाही पतीची साथ; 'आधुनिक सावित्री'चं बलिदान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 06:16 PM2022-01-22T18:16:56+5:302022-01-22T18:24:44+5:30
अंबरनाथच्या बारकू पाड्यात राहणारे वासुदेव रघुनाथ भोईर आणि गुलाबबाई वासुदेव भोईर हे वृद्ध दाम्पत्य बुधवारी दुपारी डोंबिवलीला राहणाऱ्या आपल्या मुलीकडे रिक्षेनं निघाले होते.
पंकज पाटील
अंबरनाथ : गंधकानं भरलेल्या पेटत्या ट्रकच्या धडकेत रिक्षा जळून खाक झाल्याची घटना बुधवारी अंबरनाथमध्ये घडली होती. या घटनेत रिक्षेतील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी रिक्षेतील दाम्पत्यापैकी पत्नीला रिक्षेबाहेर उडी मारणं सहज शक्य होतं. मात्र मृत्यू समोर दिसत असतानाही तिनं पतीची साथ न सोडता बलिदान दिलं. या आधुनिक सावित्रीच्या बलिदानाची गोष्ट ऐकून सध्या अंबरनाथकर हळहळतायत.
अंबरनाथच्या बारकू पाड्यात राहणारे वासुदेव रघुनाथ भोईर आणि गुलाबबाई वासुदेव भोईर हे वृद्ध दाम्पत्य बुधवारी दुपारी डोंबिवलीला राहणाऱ्या आपल्या मुलीकडे रिक्षेनं निघाले होते. त्याच परिसरात राहणाऱ्या राजेश यादव याच्या रिक्षेत हे दाम्पत्य दुपारी पावणेतीनच्या सुमारास घरून निघालं. त्यांची रिक्षा आनंदनगर पोलीस चौकीच्या पुढे वालधुनी नदीच्या पुलावर आली असता समोरून एक पेटलेला ट्रक त्यांना रिक्षेच्या दिशेनं उलटा येताना दिसला. त्यामुळं वासुदेव यांनी रिक्षाचालक राजेश याला रिक्षेतून उडी मारण्यास सांगितलं. वासुदेव भोईर यांना पायाला इजा असल्यानं आधाराशिवाय ते नीट चालूही शकत नव्हते. त्यामुळं त्यांना रिक्षेतून उडी मारणं शक्य झालं नाही. त्याचवेळी त्यांच्या पत्नी गुलाबबाई भोईर या मात्र सहजपणे रिक्षेतून बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवू शकल्या असत्या. मात्र समोर मृत्यू दिसत असतानाही त्यांनी पतीची साथ सोडली नाही आणि पतीसोबत बलिदान दिलं. रिक्षाचालक राजेश याच्या समोरच पेटत्या ट्रकनं रिक्षेला धडक देत रिक्षेचा चक्काचूर केला आणि रिक्षेलाही आगीच्या ज्वाळांनी वेढलं. लहानपणापासून वासुदेव भोईर यांच्याच बाजूला राहणाऱ्या राजेश याचे अपघाताचं दृश्य आठवताना आजही अश्रू थांबत नाहीत.
आई बाबांच्या या अपघाताबाबत मृत वासुदेव भोईर यांचा मुलगा मयूर याला विचारलं असता, आईबाबांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. बाबांना शारीरिक व्याधींमुळे चालता येत नव्हतं, मात्र आईला त्यावेळी सहज रिक्षातून उडी मारता आली असती. मात्र तरीही तिनं बाबांची साथ सोडली नाही, असं त्यानं सांगितलं.
सर्वात हृदयद्रावक गोष्ट म्हणजे ज्यावेळी ही रिक्षा आग विझवल्यानंतर बाहेर काढण्यात आली, त्यावेळी वासुदेव आणि गुलाबबाई यांचे मृतदेह एकमेकांना कवटाळून बसलेल्या अवस्थेत बाहेर काढले गेले. मृतदेह वेगळे होत नसल्यानं ते तशाच अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या काळजात मात्र मोठी कालवाकालव झाली. त्यामुळं अखेरच्या क्षणीसुद्धा पतीची साथ न सोडणाऱ्या गुलाबबाई यांना खरोखर या आधुनिक सावित्री म्हणावं लागेल.