कार्यक्रमाचा आवाज बंद करण्यास सांगणाऱ्या दाम्पत्याला मारहाण
By जितेंद्र कालेकर | Published: February 10, 2023 09:06 PM2023-02-10T21:06:39+5:302023-02-10T21:06:44+5:30
माजी नगरसेवक नरेश मणेरांसह १२ जणांविरुद्ध गुन्हा: विनयभंगाचीही तक्रार
ठाणे: घोडबंदर रोड, आनंदनगर येथील एका मैदानात गुरुवारी रात्री सुरु असलेला महाराष्ट्र महोत्सवातील आवाज बंद करण्याची मागणी एका महिलेने केली होती. मात्र, याचा राग आल्याने तेथील काही महिलांनी तिला स्टेजवरुन खाली ओढत मारहाण केली. तसेच माजी नगरसेवक नरेश मणेरा यांनीही मारहाण करीत तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या पतीलाही मारहाण केल्याचा गुन्हा कासारवडवली पोलिस ठाण्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दाखल झाला आहे.
ही ४१ वर्षीय महिला वास्तव्यास असलेल्या सोसायटीच्या बाजूला असलेल्या ठाणे महापालिकेच्या मैदानामध्ये मणेरा यांनी महाराष्ट्र महोत्सवाचे ९ फेब्रुवारी रोजी आयोजन केले होते. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास या कार्यक्रमाच्या मोठया आवाजाचा त्रास होत असल्याने तो बंद करण्याची विनंती या महिलेने मणेरा तसेच त्यांच्या सहकाºयांना केली. तेंव्हा तेथील काही महिलांनी तिला हाताच्या चापटयांनी आणि नखाने चेहºयावर मारहाण करुन स्टेजवरुन खाली ओढून तेथील सुमारे १० ते १२ महिला आणि पुरुषांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळी केल्याचा आरोप आहे. तसेच मणेरा यांनी गळा दाबून बाहयाचे जॅकेट फाडले.
त्यानंतर इतर लोकांनीही मारहाण करीत विनयभंग केल्याची तक्रार या महिलेने कासारवडवली पोलिस ठाण्यात १० फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास केली आहे. याच दरम्यान झालेल्या झटापटीमध्ये आपली सोनसाखळीही गहाळ झाली असून पतीलाही मारहाण तसेच शिवीगाळी करुन धमकी दिल्याचेही तिने तक्रारीमध्ये म्हटले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी ही महिला आल्यानंतर तिने आधी आवाज बंद करण्याचे आवाहन केले. नंतर लाथ मारुन ध्वनी यंत्रणेची तोडफोड केली. महिलांनाही धक्काबुक्की केली, अशी अदखलपात्र तक्रारही तिच्याविरुद्ध मणेरा यांच्या एका गटाने केली आहे. तसेच मणेरा यांना याप्रकरणी कलम ४१ नुसार अटकेबाबतची नोटीस बजावल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.