पोलिसांच्या तावडीतून निसटलेला प्रिन्स जेरबंद; हलगर्जीपणामुळे हवालदारावर कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: November 11, 2024 06:06 AM2024-11-11T06:06:50+5:302024-11-11T06:07:38+5:30
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ६ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.४५ वाजता तो फरार झाला होता.
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शस्त्रांची तस्करी करणारा आरोपी प्रिन्स कैलास विश्वकर्मा (वय १९, रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) हा तीन दिवसांपूर्वी पोलिसांच्या तावडीतून निसटला होता. त्याला पुन्हा लखनऊमधून अटक करण्यात यश आल्याची माहिती चितळसर पोलिसांनी रविवारी दिली. याप्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत एका पोलिस हवालदारालाही निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रिन्स हा ठाण्याच्या घोडबंदर भागात रिव्हॉल्व्हर विक्रीसाठी आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या पथकाला मिळताच त्याला सापळा लावून ५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १.३० वाजता अटक केली होती. त्याच्याविरुद्ध आर्म्स ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्याला ठाणे न्यायालयाने ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याची चितळसर पोलिस ठाण्यात डिटेक्शन रूममध्ये चौकशी सुरू असतानाच तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ६ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.४५ वाजता त्याला लावलेल्या बेडीतून हात काढून फरार झाला होता.
आराेपीला लवकरच ठाण्यात आणणार
- प्रिन्सला शोधण्यासाठी दोन पथकांची निर्मिती केली होती. गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. तो उत्तर प्रदेशातील लखनऊमधील इंदिरानगर भागात त्याच्या घरी असल्याची माहिती चितळसर पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपायुक्त जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पंकज लहाने, हवालदार नितीन बांगर आणि पोलिस नाईक पांडूरंग झोडगे यांच्या पथकाने लखनऊ भागात सीडीआर तसेच खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे उत्तरप्रदेशातील विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) मदतीने त्याला ९ नोव्हेंबर रोजी रात्री ९.१० वाजता ताब्यात घेतले.
- त्याला लखनऊ पोलिस आयुक्तालयातील इंदिरानगर पोलिस ठाण्यात हजर करुन स्थानिक न्यायालयात हजर केले.
- न्यायालयाने त्याला ट्रान्झिट रिमांड दिली असून लवकरच त्याला ठाण्यात आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हवालदार ज्योतिराम मोरकाने निलंबित
आरोपी प्रिन्स पळून गेल्याने चितळसर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २६२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिस हवालदार ज्योतिराम मोरकाने यांच्यावर वागळे इस्टेट, परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी निलंबनाचे आदेश दिले होते.