ठाण्यात लॅबोरेटरीला आग, साहित्य जळून मोठे नुकसान
By अजित मांडके | Published: June 22, 2024 03:04 PM2024-06-22T15:04:56+5:302024-06-22T15:07:20+5:30
आग सुमारे अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
ठाणे : ठाण्यातील नौपाडा परिसरातील गोखले रोडवरील अर्जुन टॉवरमध्ये तिसऱ्या माळ्यावर असलेल्या रेड क्लिप एक्सेल लॅबोरेटरीला आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली. सुमारे २ हजार ७०० स्क्वेअर फूट जागेत असलेल्या या लॅबोरेटररितील साहित्य जळून मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेला नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तीन फायर वाहन एक जम्बो वॉटर टँकर, दोन वॉटर टँकर एक रेस्क्यू वाहनासह उपस्थित झाले. तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक, आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी, महानगर गॅस कर्मचारी उपस्थित होते. आग सुमारे अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
नौपाड्यातील तळ अधिक सात मजली असलेल्या अर्जुन टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावरून धूर येत होता. तो धूर हळूहळू वाढून मोठ्या प्रमाणात येऊ लागला. याचदरम्यान आगीने ही भीषण रूप धारण केले होते. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन यांनी धाव घेतली. त्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर डॉ स्वरूप कुलकर्णी यांच्या मालकीची अंदाजे २७०० स्क्वेअर फुटच्या रेड क्लिप एक्सेल लॅबोरेटरी असून तिला आग लागली होती. तातडीने त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यास प्रयत्न सुरू केले. याचदरम्यान पोलीस आणि आपत्ती प्रतिसाद दलाने ही धाव घेतली.
जवळपास अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र या आगीत लॅबोरेटरी मधील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून त्या लॅबोरेटरीचे नुकसान झाले आहे. यावेळी, ०३- फायर वाहनासह, ०१- जम्बो वॉटर टँकर, ०२- वॉटर टँकर आणि ०१- रेस्क्यू वाहन पाचारण केले होते. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नसून ती आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून दिली.