भाईंदरच्या चौक बंदरातील मासेमारी नौका आगीच्या भक्ष्यस्थानी
By धीरज परब | Published: January 6, 2023 06:49 PM2023-01-06T18:49:52+5:302023-01-06T18:50:02+5:30
बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेली बसत्याव मुंबईकर यांची जॉन पॉल ही नौका शुक्रवारी सायंकाळी मासेमारीसाठी समुद्रात रवाना होणार होती.
मीरारोड: भाईंदरच्या चौक बंदरात नागरुन ठेवण्यात आलेल्या जॉन पॉल या मासेमारी नौकेला शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारस भीषण आग लागली. यात नौकेचा मोठा भाग जळून गेला असून नाखवाचे सुमारे २२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
चौक येथील बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेली बसत्याव मुंबईकर यांची जॉन पॉल ही नौका शुक्रवारी सायंकाळी मासेमारीसाठी समुद्रात रवाना होणार होती. त्यामुळे मासेमारीसाठी लागणारे सर्व समान, अन्नधान्य, डिझेल नौकेत भरुन ठेवण्यात आले होते. मात्र शुक्रवारी पहाटे चार वाजता नौकेला भीषण आग लागली. याची माहिती मिळताच आसपासच्या मच्छिमारांनी चौक बंदराकडे धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू आग एवढी भीषण होती की ती नियंत्रणात येईना त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
आगीत नौकेच्या इंजीनसह सर्व सामान जळून नष्ट झाले आहे तसेच नौकेचा तांडेल कॅजिटन पास्कू मुंबईकर याला किरकोळ दुखापत झाली आहे. नौकेचे सुमारे वीस ते पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी देखील याच महिन्यात वादळामुळे या नौकेचे नुकसान झाले होते.समुद्रात सुटलेल्या जोरदार वार्यांमुळे शॉर्ट सर्कीट होऊन ही आग लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने मच्छिमार नाखवास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी धी डोंगरी चौक फिशरमेन सर्वोदय सोसायटीने मत्स्यव्यवसय विभाग तसेच मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष विल्यम गोविंद यांनी दिली.