इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत पाच टक्क्यांची भर; खरेदीत वाढ, ठाणेकरांकडूनही पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 06:42 AM2023-09-07T06:42:59+5:302023-09-07T06:43:10+5:30
यंदा या कालावधीत एकूण वाहनांच्या खरेदीत पाच टक्के वाहने ही इलेक्ट्रिक असल्याचे दिसून आले आहे.
ठाणे : वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना केंद्र आणि राज्याकडून प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानुसार ठाण्यातही इलेक्ट्रिक वाहनांना हळूहळू का होईना पसंती दिली जात आहे. ठाण्यात यंदा नऊ महिन्यांत मागील वर्षीच्या तुलनेत तीन टक्के इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढली आहे.
यंदा या कालावधीत एकूण वाहनांच्या खरेदीत पाच टक्के वाहने ही इलेक्ट्रिक असल्याचे दिसून आले आहे. पर्यावरणपूरक वाहनांसाठी जनजागृती केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ लागू केले. या धोरणानुसार २०२५ पर्यंत नवीन वाहन नोंदणीत १० टक्के हिस्सा विद्युत वाहनांचा असेल, अशा रीतीने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यात येणार आहे.
२,७९७ इलेक्ट्रिक वाहनांची गेल्या आर्थिक वर्षात नोंदणी
ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात आहे. शहरात १४ लाख ८४ हजार ७१५ वाहने आहेत. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत एकूण ५५ हजार ७५४ इतक्या वाहनांची नोंदणी झाली. त्यापैकी २,७९७ इलेक्ट्रिक वाहने होती. त्यांची टक्केवारी ५ टक्के आहे. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत एकूण वाहन नोंदणीत इलेक्ट्रिक वाहनांची टक्केवारी दोन होती. त्यात वाढ झाली आहे.