ठाण्यात विचित्र अपघात; पाच वाहने एकमेकांवर आदळली, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 05:49 PM2024-06-06T17:49:43+5:302024-06-06T17:50:06+5:30
अपघातामुळे मुंबई नाशिक मार्गावर वाहतूक कोंडी: कोरम मॉल ते नितीन कंपनी वाहनांच्या रांगा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंबई - नाशिक पूर्व द्रूतगती मार्गावर नाशिककडे जाणाºया मार्गावर माजीवडा उड्डाणपूलावर गुरुवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास एकमेकांवर आदळून पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात वेगवेगळ्या दोन वाहनांमधील भरत चव्हाण (४७) आणि दीपक सिंग (३५) हे दोन चालक गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे एक तासांपेक्षा अधिक काळ या मार्गावरील वाहतूक मोठया प्रमाणात खोळंबली होती. त्यामुळे विवियाना मॉल ते नितीन कंपनीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर ही वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईकडून नाशिककडे जाणाºया मार्गावर पाच वाहनांचा एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला असून यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती एका नागरिकाने ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी राबोडी पोलिसांसह कापूरबावडी वाहतूक विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. या अपघातामध्ये दोन वेगवेगळया वाहनांमधील जखमी झालेल्या चव्हाण सिंग (३५) या दोन चालकांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये चव्हाण यांच्या डोक्याला, छातीला आणि पायाला तर सिंग यांच्याही डोक्याला, पायाला, हाताला आणि चेहºयावर गंभीर दुखापत झाली.
या अपघातात चार वाहने मुंबईकडून भिवंडी आणि माणकोली तर एक वाहन ठाण्याच्या वागळे इस्टेट येथून भिवंडी कडे जात होते. मुंबईकडून नाशिककडे जाणाºया माजिवाडा पूलावर हा अपघात झाला. त्यामुळे या मार्गावर वाहतूक शाखेने सुमारे तासभर वाहतूक बंद केली होती. घटनास्थळी अपघातग्रस्त पाच वाहने टोविंग व्हॅनच्या मदतीने ब्रिजवरून अन्यत्र हलविण्यात आली. त्यानंतर मुंबई नाशिक मार्ग दुपारी ३.१५ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात यश आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाºयांनी दिली.