खुनाच्या गुन्ह्यातील २०१७ पासूनचा फरार गुन्हेगार काशीमीरामध्ये सापडला
By धीरज परब | Published: March 9, 2024 05:43 PM2024-03-09T17:43:28+5:302024-03-09T17:43:47+5:30
शिक्षा भोगत असतांना अभिवचन (पॅरोल) च्या रजेवर तो बाहेर आला पण पुन्हा कारागृहात १८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत हजरच झाला नाही.
मीरारोड - काशीमीरा पोलीस ठाण्यात २०१० साली केलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असताना तो २०१७ सालापासून पॅरोलची रजा घेऊन फरार झाला होता. त्या गुन्हेगारास तब्बल ७ वर्षांनी अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत २०१० साली झालेल्या हत्येच्या गुन्ह्यात अटक आरोपी यकीनअली नासीरअली शेख ( वय ३६ वर्षे ) रा. गौरव संकल्प फेज ४, रवी ग्रुप, मीरारोड ह्याला ठाणे न्यायालयाने हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. शेख हा कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
शिक्षा भोगत असतांना अभिवचन (पॅरोल) च्या रजेवर तो बाहेर आला पण पुन्हा कारागृहात १८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत हजरच झाला नाही. कळंबा कारागृहात हजर न होता पळून गेलेला असल्याने त्याच्या विरुद्ध तेथील पोलीस कर्मचारी राजु शिंदे यांनी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी काशीमीरा पोलीस ठाण्यात शेख विरुद्ध फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गुन्हयातील पाहीजे व फरारी आरोपीताचा शोध घेऊन अटक करण्याबाबतचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्याअनुषंगाने मीरा भाईंदर गुन्हे शाखा कक्ष १ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक कैलास टोकले, प्रशांत गांगुर्डे व पुष्पराज सुर्वे सह संदीप शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, सचिन हुले, सचिन सावंत, विजय गायकवाड, समिर यादव, सुधीर खोत, प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी, गौरव बारी, सौरभ इंगळे, किरण आसवले, सतोष चव्हाण यांच्या पथकाने शेख याचा शोध चालवला होता.
तपास करीत असताना हवालदार पुष्पेंद्र थापा यांना शेख याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत ७ मार्च रोजी यकीनअली नासीरअली शेख (४६ ) ह्याला अटक केली. तो सध्या काशीगाव , सफारी हॉटेल मागील सन क्लब बिल्डींगमध्ये रहात होता. दहिसरच्या राजेश कंपाऊंड येथील नासिर अलि चाळ येथील पत्त्यावरचे त्याचे आधारकार्ड आढळून आले. अटक करून त्याला काशीमीरा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.