जुन्या वादाच्या रागातून टोळक्याने कृत्य; उल्हासनगरात टोळक्याने केला तरुणांचा निर्घृण खून
By सदानंद नाईक | Published: February 8, 2024 06:31 PM2024-02-08T18:31:18+5:302024-02-08T18:31:36+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील फॉरवर्ड लाईन परिसरात राहुल जयस्वाल हा तरुण कुटुंबासह राहतो.
उल्हासनगर: मध्यरात्री घरावर दगडफेक केल्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरुणांचा पोलीस ठाणे गाठण्यापूर्वीच सराईत गुंडाच्या टोळक्याने डोळ्यात मिर्ची पावडर व डोक्यात दगडी लादी टाकून राहुल जयस्वाल या तरुणाचानिर्घृण खून केला. पहाटे साडे तीन वाजता खुनाचा प्रकार घडला असून मध्यवर्ती पोलिसानी गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील फॉरवर्ड लाईन परिसरात राहुल जयस्वाल हा तरुण कुटुंबासह राहतो. काही महिन्यांपूर्वी त्याची मोटरसायकल जाळल्या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात परिसरातील बाबू ढेकणे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला होता. ढेकणे सराईत गुन्हेगार असून तो जामिनावर बाहेर आला आहे. जुन्या रागातून बुधवारी मध्यरात्री साडे तीन वाजता बाबू ढेकणे, वसंत ढेकणे, प्रवीण करोतिया, रॉबिन करोतिया, प्रणय शेट्टी, करण ढेकणे आदी जणांच्या टोळक्याने राहुल जयस्वाल यांच्या घरावर दगडफेक केली. याबाबतची तक्रार करण्यासाठी राहुल जयस्वाल हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जाण्यासाठी निघाला. या टोळक्याने त्याला पोलीस ठाणे जाण्यापूर्वीच गाठून डोळ्यात मिर्ची पावडर टाकून लोकडी लादी डोक्यात मारून खून केला. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली.
मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वीच या सराईत टोळीने गाठून राहुलची हत्या केली. मुख्य आरोपी बाबू ढेकणे यांच्यावर असंख्य गुन्हे दाखल असून गेल्या महिन्यात तो जेलबाहेर आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तर यामध्ये तडीपार गुंड रॉबिन करोतिया याचाही समावेश असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अश्या सराईत गुंडावर पोलीस वेळीच कारवाई का करीत नाही.? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. तर खुनातील सर्व आरोपीवर गुन्हे दाखल करून अटक होत नाही, तोपर्यंत राहुल याचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा जयस्वाल कुटुंबाने घेतला. परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या अश्या सराईत गुंडाच्या टोळक्यावर वेळीच कारवाई पोलीस करीत नसल्याने, निरपराध तरुण राहुलचा खून झाल्याचा आरोप शहरातून होत आहे.